इलेक्ट्रीक वाहनांवर 1.5 लाख रुपयांची सबसिडी, राज्य सरकारची भन्नाट योजना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 02:50 PM2021-06-23T14:50:56+5:302021-06-23T14:52:42+5:30
गुजरात सरकारच्या या योजनेनुसार दुचाकी वाहनांसाठी 20 हजार रुपयांपर्यंतची सबसिडी मिळणार आहे. किलोवॅटच्या आधारे राज्य सरकार इलेक्ट्रीक वाहनांवर सबसिडी देणार असल्याची घोषणा गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी केली आहे.
अहमदाबाद - देशात पेट्रोल आणि इंधन दरवाढीमुळे इलेक्ट्रीकल्स वाहनांचा पर्याय म्हणून वापर करण्यासाठी अनेकजण पुढाकार घेत आहेत. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीही इलेक्ट्रीक वाहनांचा वापर करण्याचं आवाहन नागरिकांना केलं होतं. गुजरात सरकारने इलेक्ट्रीक वाहनांचा वापर वाढवा आणि नागरिकांना सोयीचं व्हावं, यासाठी नवी (ईवी) योजनेची घोषणा केली आहे. या योजनुसार, पुढील 4 वर्षात 2 लाख ईलेक्ट्रीक वाहनांसाठी तब्बल 870 कोटी रुपयांची सबसिडी जाहीर केली आहे.
गुजरातसरकारच्या या योजनेनुसार दुचाकी वाहनांसाठी 20 हजार रुपयांपर्यंतची सबसिडी मिळणार आहे. किलोवॅटच्या आधारे राज्य सरकार इलेक्ट्रीक वाहनांवर सबसिडी देणार असल्याची घोषणा गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी केली आहे. ग्राहकांना प्रोत्साहन देऊन बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांची विक्री वाढविण्यासाठी राज्य सरकारने ही ईवी योजना आखली आहे. या योजनेनुसार दुचाकी इलेक्ट्रीकल्स वाहनांसाठी 20 हजार आणि चारचाकी वाहनांसाठी 1.5 लाख रुपयांची सबसिडी मिळणार आहे.
ईवी योजनेनुसार राज्य सरकारतर्फे राज्यात 250 चार्जिंग स्टेशनची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी, 10 लाख रुपयांच्या 25 टक्के सबसिडीचीही घोषणा रुपाणी यांनी केली आहे. त्यामुळे, जवळपास 1.25 लाख दुचाकी, 75 हजार रिक्षा आणि 25 हजार इलेक्ट्रीक कार रस्त्यावर धावतील, असा विश्वास रुपाणी यांनी व्यक्त केला आहे.
गुजरात आरटीओमध्ये नोंदणीकृत वाहनांना नोंदणी शुल्कात सवलत मिळणार आहे. तर, सबसिडीची रक्कम थेट ग्राहकांच्या बँकेत जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींद्वारे आयोजित पर्यावरण दिवसच्या कार्यक्रमात या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. वायू प्रदुषण टाळण्यात या योजनेचा मोठा उपयोग होणार आहे.