पुलवामा हल्ल्यातील १९ पैकी १५ दहशतवाद्यांचा बदला घेतला, इतर ४ जण कुठे आहेत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 14:44 IST2024-02-14T14:44:42+5:302024-02-14T14:44:56+5:30
Pulwama Attack: पाच वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात भारताच्या ४० जवानांना वीरमरण आलं होतं. या हल्ल्यामुळे देशभरात खळबळ उडाली होती.

पुलवामा हल्ल्यातील १९ पैकी १५ दहशतवाद्यांचा बदला घेतला, इतर ४ जण कुठे आहेत?
पाच वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात भारताच्या ४० जवानांना वीरमरण आलं होतं. या हल्ल्यामुळे देशभरात खळबळ उडाली होती. पाच वर्षांनंतरही या हल्ल्याचा मास्टरमाईंड असलेला मौलाना मसूद अझहर हा भारताच्या ताब्यात येऊ शकलेला नाही. मात्र मागच्या पाच वर्षांत या हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या १९ पैकी १५ दहशतवाद्यांना पकडण्यात किंवा ठार मारण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. मात्र या हल्ल्यातील मुख्य आरोपी मौलाना मसूद अझहरसोबत चार दहशतवादी अद्याप भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागलेले नाहीत.
पुलवामा हल्ल्यानंतर या हल्ल्याचा मास्टर माइंड असलेला मौलाना मसूद अझहर, त्याचा भाऊ रौफ अझगर आणि नातेवाईक अम्मार अलवी हे अद्याप मोकाट आहेत. हे तिघेही पाकिस्तानी नागरिक असून, त्यांना २०१९-२१ दरम्यान दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. तर या हल्ल्यात सहभागी असलेला चौथा दहशतवादी मोहम्मद इस्माइल हा फरार आहे.
१४ फेब्रवारी २०१९ रोजी या दहशतवाद्यांनी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यामधील एका बसला आत्मघाती हल्ला करून लक्ष्य केले होते. या हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० जवानांचा मृत्यू झाला होता.
एनआयएने दिलेल्या माहितीनुसार अझगर याने पुलवामा हल्ल्यानंतर आणखी एका हल्ल्याची आखणी केली होती. मात्र बालाकोटमधील एअरस्ट्राइक आणि फारुख याच्या हत्येनंतर अझगर याने ती योजना टाळली. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे घुसून एअरस्ट्राईल केली होती. तसेच शेकडो दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.