यूपीतील शाळांच्या १५ सार्वजनिक सुट्ट्या झाल्या रद्द
By admin | Published: April 26, 2017 02:20 AM2017-04-26T02:20:58+5:302017-04-26T02:20:58+5:30
उत्तर प्रदेश सरकारने ख्यातनाम व्यक्तींच्या जयंती किंवा पुण्यतिथी दिनी दिल्या जाणाऱ्या १५ सार्वजनिक सुट्ट्या मंगळवारी रद्द केल्या.
लखनौ : उत्तर प्रदेश सरकारने ख्यातनाम व्यक्तींच्या जयंती किंवा पुण्यतिथी दिनी दिल्या जाणाऱ्या १५ सार्वजनिक सुट्ट्या मंगळवारी रद्द केल्या. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. या सुट्ट्यांच्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयांत त्या व्यक्तींच्या कार्याची माहिती दिली जाईल, असे कॅबिनेट मंत्री श्रीकांत शर्मा यांनी सांगितले.
राज्यात ४२ सार्वजनिक सुट्ट्या असून, त्यातील १७ सुट्ट्या या प्रसिद्ध व्यक्तींच्या जयंती दिनाच्या आहेत. या आधीच्या समाजवादी पक्षाच्या सरकारने माजी पंतप्रधान चंद्रशेखर (१७ एप्रिल), महर्षी काश्यप आणि महर्षी निशदराज जयंती (५ एप्रिल), हजरत अजमेरी गरीब नवाज उरूस (२६ एप्रिल), महाराणा प्रताप जयंती (९ मे) व डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिन (६ डिसेंबर) या सुट्ट्या जाहीर केल्या होत्या. सुट्ट्यांची सुधारित यादी लवकरच जाहीर केली जाईल, असे शर्मा म्हणाले. योगी आदित्यनाथ यांनी दोन आठवड्यांपूर्वी सार्वजनिक सुट्ट्यांबद्दल चिंता व्यक्त केली होती. (वृत्तसंस्था)