१५ राण्या आणि ३० मुलांसह आले राजे मस्वाती
By admin | Published: October 30, 2015 09:58 PM2015-10-30T21:58:32+5:302015-10-30T21:58:32+5:30
राजधानीत आयोजित भारत-आफ्रिका शिखर संमेलनाचा गुरुवारी समारोप झाला. या संमेलनाकरिता अनेक आफ्रिकी देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि नेते भारतात आले होते.
नवी दिल्ली : राजधानीत आयोजित भारत-आफ्रिका शिखर संमेलनाचा गुरुवारी समारोप झाला. या संमेलनाकरिता अनेक आफ्रिकी देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि नेते भारतात आले होते. स्वाझीलंडचे राजे मस्वाती तृतीय हेसुद्धा यात सहभागी झाले होते. मात्र, ते संमेलनापेक्षा त्यांच्या सोबत आलेल्या ताफ्यामुळेच अधिक चर्चेत राहिले. कारण मस्वाती तृतीय आपल्यासोबत त्यांच्या १५ राण्या, ३० मुले आणि १०० नोकरांनाही घेऊन आले आहेत. दिल्लीतील हॉटेलमध्ये त्यांचा हा ताफा मुक्कामी आहे.
हॉटेलच्या २०० खोल्या बुक
मस्वाती तृतीय यांनी दिल्लीच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये २०० खोल्या बुक केल्या आहेत. मस्वाती स्वत: ज्या खोलीत थांबले आहेत तिचे दिवसाचे भाडे सुमारे दीड लाख रुपये आहे, तर इतर खोल्यांचे भाडे ७ ते १५ हजारांदरम्यान आहे. १९६८ साली देशाला इंग्रजी राजवटीतून मुक्त करणारे मस्वाती यांचे वडील सोभुजा द्वितीय यांच्या १२५ राण्या होत्या. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मस्वाती तृतीय यांनी मोठ्या कुटुंबाची परंपरा कायम ठेवली. त्यांच्या १५ राण्यांपैकी दोघींनाच शाही दर्जा प्राप्त आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)