देशात मिनिटाला १५ आत्महत्या !
By admin | Published: July 20, 2015 01:50 AM2015-07-20T01:50:03+5:302015-07-20T01:50:03+5:30
गतवर्षी देशात दर मिनिटाला १५ व्यक्तींनी आत्महत्या करून आयुष्य संपवले. सन २०१४ मध्ये देशभरात एकूण १.३१ लाख लोकांनी आत्महत्या केली.
नवी दिल्ली : गतवर्षी देशात दर मिनिटाला १५ व्यक्तींनी आत्महत्या करून आयुष्य संपवले. सन २०१४ मध्ये देशभरात एकूण १.३१ लाख लोकांनी आत्महत्या केली. या वर्षात देशातील विविध राज्यांपैकी महाराष्ट्रात आत्महत्येच्या सर्वाधिक घटना घडल्या, तर शहरांमध्ये चेन्नईत सर्वाधिक आत्महत्या झाल्या.
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी शाखेच्या (एनसीआरबी) अहवालातून हे वास्तव समोर आले आहे. अहवालानुसार सन २०१४ मध्ये महाराष्ट्रात आत्महत्येच्या १६,३०७ घटना घडल्या. या पाठोपाठ तामिळनाडूत १६,१२२ आाणि पश्चिम बंगालमध्ये अशा १४,३१० घटना घडल्या. टक्केवारीत सांगायचे तर महाराष्ट्रात गतवर्षी सर्वाधिक म्हणजे १२.४ टक्के, तर तामिळनाडू आणि प. बंगालमध्ये अनुक्रमे १२.२ आणि १०.९ टक्के आत्महत्या घडल्या. आत्महत्या केलेल्या ६९.७ टक्के लोकांचे वार्र्षिक उत्पन्न एक लाखापेक्षाही कमी होते. याशिवाय जीवन संपविणाऱ्या प्रत्येक सहापैकी एक गृहिणी होती, असेही या अहवालातून उघड झाले आहे.
सर्वाधिक अपघाती मृत्यू राज्यात
राज्यातील रस्ते अधिकाधिक असुरक्षित बनत असल्याचे चित्र राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालावरून निर्माण होत आहे. २०१४ या वर्षात देशभरातील रस्ते अपघातात तब्बल १.४ लाख लोकांचे बळी गेले आहेत आणि त्यापैकी सर्वाधिक बळी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांत गेले आहेत. वर्षभरात देशात झालेल्या एकूण ४.५ लाख अपघातांपैकी सर्वाधिक अपघात झालेल्या राज्यांच्या यादीतही महाराष्ट्राचा समावेश आहे.
२०१३ च्या तुलनेत गेल्या वर्षी रस्ते अपघातात ३ टक्के अधिक लोकांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी रस्ते अपघातात तब्बल ४.८ लाख लोक जखमी झाले आहेत. वेगाने आणि धोकादायकरित्या वाहाने हाकणे, हे वाढत्या अपघातांमागील प्रमुख कारण आहे. तसेच मोटारसायकल आणि ट्रक-लॉरी यांचा सहभाग असलेल्या अपघातांचे प्रमाण एकूण अपघातांच्या निम्मे आहे. दुचाकीच्या अपघातांत १३,७८७ चालक ठार झाले आहेत, तर २३,५२९ अन्य लोक बळी पडले आहेत.