बुलंदशहर सामुहिक बलात्कार प्रकरणात १५ संशयित ताब्यात...

By admin | Published: July 31, 2016 07:18 PM2016-07-31T19:18:53+5:302016-07-31T19:18:53+5:30

महिला आणि तिच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणात १५ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून मुख्य आरोपीची ओळख पटली आहे.

15 suspects arrested in Bulandshahar gang rape case | बुलंदशहर सामुहिक बलात्कार प्रकरणात १५ संशयित ताब्यात...

बुलंदशहर सामुहिक बलात्कार प्रकरणात १५ संशयित ताब्यात...

Next

ऑनलाइन लोकमत
बुलंदशहर, दि. ३१ : महिला आणि तिच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणात १५ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून मुख्य आरोपीची ओळख पटली आहे. दिल्ली-कानपूर राष्ट्रीय महामार्गावरील बुलंदशहर वळण रस्त्यावर अत्याचाराची घटना शुक्रवारी रात्री घडली. दरोडेखोरांनी महिला व मुलीला त्यांच्या कारमधून ओढून नेले होते.

अखिलेश यादव यांनी बुलंदशहरच्या उप पोलीस अधीक्षकांना या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी २४ तासांची मुदत दिली आहे. त्याशिवाय त्या भागातील पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले. बुलंदशहरचे उप पोलीस अधीक्षक वैभव कृष्णा म्हणाले की गुन्हेगारांना पकडण्यासाठी विशेष कृती दलाच्या १५ तुकड्या कामाला लावण्यात आल्या असून बुलंदशहर, मेरठ व इतर जिल्ह्यांत तसेच राज्यातही छापे टाकण्यात येत आहेत. १५ संशयितांना पकडण्यात आले असून मुख्य आरोपीची ओळख पटली आहे. तो भटक्या जमातीचा असून गुन्हेगारीत सक्रिय आहे.

अत्याचार झालेले कुटुंब नोएडाहून शहाजहानपूरला कारने निघाले होते. दरोडेखोरांच्या टोळीने त्यांच्यावर दबा धरून हल्ला केला. महिला व तिच्या १३ वर्षांच्या मुलीला बाहेर ओढले व जवळच्या शेतात नेले व तेथे त्यांच्यावर बलात्कार केला. कारमधील पुरुषांना दोरीने बांधून टाकण्यात आले होते. त्यांनी रोख रक्कम, दागिने व मोबाईल फोन्सही लुटले. कुटुंबातील एकाने पळून जाण्यात यश मिळवून घटना पोलिसांना कळविली. या प्रकरणात हलगर्जीपणा केल्याबद्दल कोतवाली देहातचे ठाणे अमलदार रामसेन यांना या प्रकरणातून दूर करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर विरोधकांनी जोरदार हल्ला करून उत्तर प्रदेश म्हणजे गुंडांचे राज्य असल्याचे व प्रशासन कोलमडून पडल्याचे म्हटले. या घटनेची गंभीर दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने म्हटले आहे की पीडितांची व अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी उत्तर प्रदेशला आम्ही सदस्य पाठविला आहे. परंतु अशा प्रकरणांत राज्य प्रशासनाकडून फारसे सहकार्य मिळत नसल्याची तक्रार आयोगाने केली आहे.

भाजप, बसपा आणि काँग्रेसने समाजवादी पक्षाच्या सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी केली. केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी यादव सरकारवर टीका करताना हे कधी संपणार असा प्रश्न विचारला आहे. बसपचे नेते सुधींद्र भदोरिया यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे म्हटले.

Web Title: 15 suspects arrested in Bulandshahar gang rape case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.