घोटाळेबाजांची 15 हजार कोटींची संपत्ती जप्त; अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 08:14 AM2023-08-01T08:14:00+5:302023-08-01T08:14:21+5:30
या कायद्यानुसार देशात आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली, याबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी माहिती दिली.
नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाने मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत गेल्या दहा वर्षांत बँक घोटाळे करुन देश सोडून पळून गेलेल्या १४ गुन्हेगारांची १५ हजार ८०५ कोटींची संपत्ती जप्त केल्याची माहिती आज केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी लोकसभेत दिली.
या कायद्यानुसार देशात आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली, याबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी माहिती दिली. लोकसभेत संजय जाधव आणि विनायक राऊत यांनी उपस्थित केलेल्या अतारांकित प्रश्नाच्या उत्तरात डॉ. कराड यांनी ही माहिती दिली.
१४,३०२ कोटींची करचोरी, २८ अटकेत
चालू वित्त वर्षाच्या पहिल्या २ महिन्यांत १४,३०२ कोटी रुपयांची जीएसटी चोरी उघडकीस आली असून याप्रकरणी २८ लोकांना अटक करण्यात आली आहे.
केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेतील एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, एप्रिल-मेमध्ये जीएसटी चोरीची २,७८४ प्रकरणे उघडकीस आली.
या करचोरीमधील ५,७१६ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. सीतारामन यांनी सांगितले की, मागील ५ वर्षांत आयकर विभागाने ३,९४६ समूहांवर छापे मारून ६,६६२ कोटी रुपये जप्त केले.
काय कारवाई केली?
७५७ प्रकरणे दहा वर्षात नोंदवली
३६ प्रकरणे चालू वर्षातील
१४ फरारपैकी ७ गुन्हेगार घोषित