कौतुकास्पद! शेंगदाणे विक्रेत्याच्या लेकाची बातच न्यारी; इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 12:41 PM2021-01-23T12:41:31+5:302021-01-23T12:43:38+5:30

Abhishek Chandra International book of record : छोट्या गावात राहणाऱ्या एका मुलाने आपल्या नावे मोठा विक्रम केला आहे.

15 year old boy Abhishek Chandra name register in international book of records | कौतुकास्पद! शेंगदाणे विक्रेत्याच्या लेकाची बातच न्यारी; इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड भारी

कौतुकास्पद! शेंगदाणे विक्रेत्याच्या लेकाची बातच न्यारी; इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड भारी

googlenewsNext

नवी दिल्ली - प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर सर्व गोष्टी साध्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. छोट्या गावात राहणाऱ्या एका मुलाने आपल्या नावे मोठा विक्रम केला आहे. शेंगदाणे विक्रेत्याच्या मुलाने आपल्या नावावर इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डची नोंद केली आहे. अभिषेक चंद्रा (Abhishek Chandra) असं या मुलाचं नाव असून अतिशय सामान्य कुटुंबातील मुलगा आहे. अभिषेक उत्तराखंडच्या उधमसिंह नगर जिल्ह्यातील रंपुराचा रहिवासी असून त्याचं नाव थेट इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (International book of record) नोंदवलं गेलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार चंद्रा असं अभिषेकच्या वडिलांचं नाव असून ते शेंगदाणे विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गांधीपार्कमध्ये त्यांचं छोटंस दुकान आहे. अभिषेकने आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर कमाल केली आहे. फक्त 1 मिनिट 58 सेकंदांमध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या (united nations organizations) यादीत नोंदणीकृत असलेल्या सर्व 196 देशांची नावं म्हणून दाखवली आहे.  लॉकडाऊनमध्ये अभिषेकने जगातील देशांची नावं पाठ करणं सुरू केलं होतं. त्यानं काही काळानंतर इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डचा ऑनलाईन फॉर्म भरला. त्यानंतर त्यानं व्हॉट्सअपच्या माध्यमातून संबंधित लोकांना आपला व्हिडिओ पाठवला.

घराची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अभिषेक सकाळी पेपर टाकण्याचं काम करतो. त्यातून तो आपल्या खासगी शिकवणीचा खर्च भागवतो. अभिषेक आदित्यनाथ झा इंटर कॉलेजमध्ये अकरावीचा विद्यार्थी आहे. वृत्तपत्रामध्ये छापून आलेल्या बातमीमुळे ही कल्पना सुचली आहे. एका व्यक्तीने केलेला रेकॉर्ड पाहून प्रेरणा मिळाल्याचं अभिषेकने म्हटलं आहे. त्यानंतर चार टप्प्यात त्याची परीक्षा घेण्यात आली. त्यात यशस्वी त्याला वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्सचं प्रमाणपत्र आणि मेडल पाठवण्यात आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

काही दिवसांपूर्वी हैदराबादच्या एका चिमुकल्याने कमाल केली आहे. तल्लख बुद्धीमत्तेमुळे त्याची वर्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (World Book of Record) नोंद करण्यात आली आहे. अवघं एक वर्ष आणि नऊ महिने वय असलेल्या चिमुकल्याच्या दमदार कामगिरीने सर्वच आश्चर्यचकीत झाले आहेत. आदिथ विश्वनाथ गौरीशेट्टी (Aadith Vishwanath Gourishetty) असं मुलाचं नाव असून सर्वत्र त्याचं भरभरून कौतुक केलं जात आहे. वर्ड बुक ऑफ रेकॉर्डसोबत आदिथच्या नावे अन्य ही अनेक रेकॉर्डची नोंद करण्यात आली आहे. 

आदिथची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद 

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, तेलगू बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि अन्य दोन राष्ट्रीय रेकॉर्ड्समध्ये आदिथच्या नावाची नोंद आहे. आदिथची शार्प मेमरी पाहून अनेक जण भारावून गेले आहे. एवढ्या लहान वयात अनेक गोष्टींचं ज्ञान कसं काय असू शकतं?, सर्व गोष्टी कशा लक्षात राहतात? असाच प्रश्न अनेकांना पडला आहे. विविध देशाचे झेंडे, कारचे लोगो, अल्फाबेट्स, देवदेवतांची नावे यासाह अनेक गोष्टी आदिथ क्षणात ओळखतो. घरातील विविध उपकरणं, रंगांची नाव, प्राणी, पक्षांची नावं, फळं, भाज्या यासह असंख्य गोष्टी त्याच्या लक्षात राहतात. शार्प मेमरीसाठी आदिथ लोकप्रिय झाला आहे. अवघड गोष्टींची उत्तर तो अत्यंत सहज देत असल्याने सर्वांनाचं त्याच्या बुद्धिमत्तेचं कौतुक आहे.


 

Web Title: 15 year old boy Abhishek Chandra name register in international book of records

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.