Coronavirus: 'सर्व धार्मिक विश्वस्त मंडळांना ८०% संपत्ती दान करण्यास सांगा'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 08:48 PM2020-03-30T20:48:12+5:302020-03-30T20:50:50+5:30
Coronavirus दहावीतल्या मुलांचा थेट मोदींना मेल; पंतप्रधानांना अनोखी सूचना
नवी दिल्ली: कोरोनाचं संकट दिवसागणिक गंभीर रुप धारण करू लागलं आहे. देशात १२६३ जणांना कोरोनाची लागण झाली असून ३० पेक्षा अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होण्याची दाट शक्यता असल्यानं अनेक जण मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. कॉर्पोरेट कंपन्या, बॉलिवूड कलाकार, क्रीडापटूंनी कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी मदत करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर देहरादूनमधील एका १५ वर्षीय विद्यार्थ्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींना मेल केला आहे. त्यानं मेलमधून एक अतिशय महत्त्वाची मागणी केली आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ मार्चला देशात लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. याचा सर्वाधिक फटका असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना, मजुरांना बसला. उपजीविकेसाठी शहरात आलेल्या कोट्यवधी लोकांचा रोजगारच बुडाल्यानं त्यांनी गावाकडे धाव घेतली. लॉकडाऊनचा कालावधी वाढवला गेल्यास काय करायचं, उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न कोट्यवधी लोकांसमोर आहे. या सगळ्यांना दिलासा देण्यासाठी १५ वर्षीय अभिनव कुमार शर्मानं मोदींना एक अनोखा सल्ला दिला आहे.
देहरादूनच्या सेंट जोसेफ ऍकॅडमीत शिकणाऱ्या अभिनवनं मोदींना मेल केला आहे. देशातल्या सर्व धार्मिक स्थळांच्या मंडळांना, विश्वस्त संस्थांना, मग त्या कोणत्याही धर्माच्या असोत, त्यांना पंतप्रधान सहाय्यता निधीत ८० टक्के संपत्ती दान करण्याच्या सूचना द्या, अशी अनोखी मागणी अभिनवनं केली आहे. सर्व धार्मिक संस्थांना दान करणं अनिवार्य करावं. लॉकडाऊनच्या कालावधीत हा पैसा देशवासीयांच्या कामी येईल, असंदेखील अभिनवनं सुचवलं आहे.
'देवाकडे असलेल्या पैशांमधून देवाच्या लेकरांचे प्राण वाचल्यास देवाला आनंदच होईल. यामुळे माणुसकीवरील विश्वास वाढेल', अशी भावनिक साददेखील त्यानं घातली आहे. माझे आई, वडील वैद्यकीय क्षेत्रात काम करतात. ते दररोज मला रुग्णालयातील परिस्थिती सांगतात, असंदेखील अभिनवनं पंतप्रधान मोदींनी लिहिलेल्या मेलमध्ये नमूद केलं आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढवला गेल्यास धार्मिक संस्थानांमधून मिळालेल्या पैशांमधून गरिबांना मदत करता येईल, असं अभिनवनं सुचवलं आहे.