केजीमध्ये ‘ढ’ ठरलेला निर्भय १५व्या वर्षी इंजिनीअर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 01:10 AM2017-08-07T01:10:27+5:302017-08-07T01:11:17+5:30

इतर मुले जेव्हा इयत्ता १०वीची शालांत परीक्षा देण्याची तयारी करत असतात, तेव्हा निर्भय ठक्कर या विद्यार्थ्याने बीई (इलेक्ट्रिकल) ही अभियांत्रिकी पदवी मिळविली आहे.

 15-year-old engineer decides to become 'Dh' in KG | केजीमध्ये ‘ढ’ ठरलेला निर्भय १५व्या वर्षी इंजिनीअर!

केजीमध्ये ‘ढ’ ठरलेला निर्भय १५व्या वर्षी इंजिनीअर!

Next

अहमदाबाद : इतर मुले जेव्हा इयत्ता १०वीची शालांत परीक्षा देण्याची तयारी करत असतात, तेव्हा निर्भय ठक्कर या विद्यार्थ्याने बीई (इलेक्ट्रिकल) ही अभियांत्रिकी पदवी मिळविली आहे. विशेष म्हणजे, सीनियर केजीच्या वर्गात असताना शिक्षकांनी अभ्यासात ‘कच्चा’ असल्याचा शेरा दिलेला निर्भय गुजरात तंत्रज्ञान विद्यापीठाचा सर्वात
तरुण अभियांत्रिकी पदवीधर झाला आहे!
निर्भयचे वडील धवल ठक्कर हेही अभियंते असून, त्याची आई डॉक्टर आहे. वडील जामनगर येथे एका खासगी कंपनीत नोकरीस होते, तेव्हा तेथे शिकत असताना निर्भयचे हे झटपट शिक्षण इयत्ता आठवीपासून सुरू झाले. गुजरात राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमानुसार इयत्ता सातवी उत्तीर्ण झाल्यानंतर, निर्भयने ‘केंब्रिज इंटरनॅशनल एक्झामिनेशन्स’तर्फे घेतल्या जाणाºया इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतच्या परीक्षा सहा महिन्यांत पूर्ण केल्या. त्यानंतर इयत्ता ११ वी व १२ वीच्या परीक्षा तो पुढील अवघ्या तीन महिन्यांत उत्तीर्ण झाला.
एवढ्या लहान वयात अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमास प्रवेश मिळविण्यासाठी निर्भयच्या आई-वडिलांना अ. भा. तंत्रशिक्षण परिषदेच्या विशेष समितीकडे त्याची असमान्य पात्रता पटवून द्यावी लागली. अशा विशेष प्रवेशास ‘जीटीयू’ म्हटले जाते. एसएएल अभियांत्रिकी महाविद्यालयातून निर्भयने अभियांत्रिकीचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला.
या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेश वसानी यांनी सांगितले की, शिक्षकांच्या मदतीने आम्ही निर्भयसाठी खास ‘फास्ट ट्रॅक’ अभ्यासक्रम तयार केला. हा अभ्यासक्रम ‘क्रेडिट’ पद्धतीचा होता. ‘जीटीयू’ निकषांनुसार फक्त निर्भयसाठी वेगळ््या प्रश्नपत्रिका तयार करून त्याच्या परीक्षा घेतल्या गेल्या व निकाल जाहीर केले गेले.
आपल्या मुलावर संपूर्ण लक्ष केंद्रित करता यावे यासाठी धवल ठक्कर यांनी वयाच्या ३६ व्या वर्षी नोकरी सोडली. आज निर्भयने हे धवल यश संपादन केल्यावर मागे वळून पाहताना धवल ठक्कर म्हणाले, सीनियर केजीमध्ये शिक्षकांनी निर्भयला अभ्यासात कच्चा ठरविले तेव्हा मला आश्चर्य वाटले व मी मुलाच्या शिक्षणासाठी पूर्ण वेळ लक्ष देण्याचे ठरविले. पारंपरिक परीक्षा पद्धतीत मुलांच्या फक्त घोकंपट्टीचा कस लागतो. आम्ही निर्भयच्या मनातून मार्कांची भीती पार निघून जाईल अशी अध्यापन पद्धती अनुसरली.त्यात केवळ वाचन आणि ऐकणे एवढेच नव्हते तर नाविन्यपूर्ण कल्पना करणे आणि त्या कल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचे व्यवहार्य मार्ग शोधणे यावर भर होता.
सभोवतालच्या जगाकडे डोळसपणे पाहण्याची दृष्टी वडिलांनी दिली त्याचा हा सर्व अभ्यास करताना खूप उपयोग झाला, असे निर्भय सांगतो. तो म्हणतो की, अभियांत्रिकी पदवी हा केवळ पायचा दगड आहे. पुढे जाऊन संशोधन आणि नव्या उत्पादनांचा विकास करण्याचा माझा मानस आहे, असे निर्भय म्हणाला.
कॉलेजमध्ये असताना दिवसाचे नऊ तास अभ्यास करणारा निर्भय फावल्या वेळात विरंगुळा म्हणून फूटबॉल व बुद्धिबळ खेळतो आणि पोहोतो.

अभियांत्रिकीमध्ये अनेक विषय सामायिक असतात. त्यामुळे पुढील तीन वर्षांत विविध १० शाखांच्या अभियांत्रिकी पदव्या मिळविण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
-निर्भय ठक्कर, सर्वात तरुण अभियंता

कोणतेही मूल अभ्यासात कच्चे किंवा हुशार नसते. तुम्ही त्याचे मन कसे घडविता आणि त्याला दैनंदिन व्यवहारातून अभ्यास करायला कसे शिकविता, यावर सर्व अवलंबून आहे.
- धवल ठक्कर,
निर्भयचे वडील

Web Title:  15-year-old engineer decides to become 'Dh' in KG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.