धक्कादायक! प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी दिल्लीत आलेले लष्कराचे 150 जवान कोरोना पॉझिटिव्ह, सर्व जण क्वारंटाइन
By श्रीकृष्ण अंकुश | Published: December 26, 2020 10:08 PM2020-12-26T22:08:28+5:302020-12-26T22:10:10+5:30
येते आलेल्या सर्व जवानांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ज्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांना सेफ बबलमध्ये ठेवण्यात आले आहे. परेडमध्ये सहभागी होणाऱ्या जवानांसाठी सेफ बबल तयार करण्यात आला आहे.
नवी दिल्ली - आर्मी डे आणि 26 जानेवारीच्या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी दिल्लीत आलेल्या लष्कराच्या 150 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. देशभरातून जवळपास 2000 जवान नोव्हेंबरच्या अखेरीस दिल्ली येथे आले होते. त्यांना रिहर्सलनंतर प्रजासत्ताक दिन आणि आर्मी डेच्या परेडमध्ये सहभागी व्हायचे होते.
15 जानेवारीला होणार आर्मी डे परेड -
येते आलेल्या सर्व जवानांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ज्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांना सेफ बबलमध्ये ठेवण्यात आले आहे. परेडमध्ये सहभागी होणाऱ्या जवानांसाठी सेफ बबल तयार करण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनापूर्वी 15 जानेवारीला आर्मी डेची परेड होणार आहे. तर संक्रमित जवान डॉक्टर्सच्या देखरेखीत क्वारंटाइन आहेत. रिकव्हर झाल्यानंतर ते पुन्हा रिहर्सल कॅम्पमध्ये सामील होतील.
यावेळी इंग्लंडचे पंतप्रधान असतील प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे -
इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे यावेळच्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यासाठी सरकारने त्यांना निमंत्रण दिले आहे. जॉन्सन यांनीही त्याचा स्वीकार केला आहे. भारत दौऱ्यावर आलेले इंग्लंडचे परराष्ट्रमंत्री डोमिनिक राब यांनी स्वतःच याची माहिती दिली होती. पंतप्रधान जॉन्सन यांना भारताकडून प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाचे निमंत्रण पाठवणे, ही आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे, असे डोमिनिक राब म्हणाले होते.