अरे, मानवा! किती निर्दयी झालास तू; १०० हून अधिक कुत्र्यांना विष देऊन ठार मारलं अन् त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 08:12 PM2021-09-09T20:12:50+5:302021-09-09T20:15:51+5:30

ही घटना १५० माकडांना मारल्याच्या काही आठवड्यातच घडली आहे. कुत्र्यांना विष दिल्याची घटना भद्रावती तालुक्यातील कंबादालु होसुरु गावातील आहे.

150 dogs found buried in Karnataka’s Shivamogga, police probe on | अरे, मानवा! किती निर्दयी झालास तू; १०० हून अधिक कुत्र्यांना विष देऊन ठार मारलं अन् त्यानंतर...

अरे, मानवा! किती निर्दयी झालास तू; १०० हून अधिक कुत्र्यांना विष देऊन ठार मारलं अन् त्यानंतर...

Next
ठळक मुद्देशिवमोगा वनविभागाच्या रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी घटनास्थळी पाहणी केली. सुरुवातीच्या तपासात ग्राम पंचायतीच्या आदेशावरुनच कुत्र्यांना विष दिल्याचं उघड झालं आहेग्राम पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन पुढील तपास केला जात आहे.

शिवमोगा – कर्नाटकातील शिवमोगा इथं मानवी क्रूरतेची सगळी हद्द पार करत मुक्या जनावरांना विष देऊन मारल्याची खळबळजनक घटना घडली आहे. १०० पेक्षा जास्त भटक्या कुत्र्यांना विष दिल्याचा प्रकार घडला आहे. या कुत्र्यांना शिवमोगा जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील एका गावात दफन केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कुत्र्याचे मृतदेह बाहेर काढले

ही घटना १५० माकडांना मारल्याच्या काही आठवड्यातच घडली आहे. कुत्र्यांना विष दिल्याची घटना भद्रावती तालुक्यातील कंबादालु होसुरु गावातील आहे. गावातील लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवमोगा वनविभागाच्या रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी घटनास्थळी पाहणी केली. पशु वैद्यकीय अधिकारी आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने कुत्र्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी या घटनेत गुन्हा नोंदवून घेत तपासाला सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या तपासात ग्राम पंचायतीच्या आदेशावरुनच कुत्र्यांना विष दिल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे ग्राम पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन पुढील तपास केला जात आहे.

कुत्र्यांना जिंवतच दफन केलं नाही ना?

वन्यप्राणी रेस्क्यू क्लबच्या कार्यकर्त्यांना संशय आहे की, कुत्र्यांना या ठिकाणी जिवंतच दफन केले तर नाही. शिवमोगा येथील पोलीस अधीक्षक लक्ष्मी प्रसाद यांनी सांगितले की, ग्राम पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या लोकांनी कुत्र्यांना विष पाजून मारल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यानंतर कुत्र्यांना दफन केले. ग्राम पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद केल्यानंतर पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांची विशेष टीम घटनास्थळी पाहणी करत आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच या प्रकरणात लवकरच रिपोर्ट सुपूर्द केला जाईल. मृत झालेल्या आणि दफन करण्यात आलेल्या कुत्र्यांची संख्या नेमकी किती याबाबत आत्ताच काही सांगू शकत नाही. परंतु शिवमोगा प्राणी रेस्क्यू क्लबच्या कार्यकर्त्यांनी जवळपास १०० हून अधिक कुत्र्यांना विष देऊन ठार मारण्यात आले. त्यानंतर त्यांना दफन केल्याचा दावा करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून दोषींवर कठोर शासन व्हावं अशी मागणी प्राणीमित्रांकडून करण्यात येत आहे.   

 

Web Title: 150 dogs found buried in Karnataka’s Shivamogga, police probe on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.