150 तासात योगींनी घेतले 50 मोठे निर्णय
By Admin | Published: March 27, 2017 12:13 PM2017-03-27T12:13:28+5:302017-03-27T12:13:28+5:30
उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा संभाळताच योगी आदित्यनाथ यांनी निर्णयाचा धडाका लावला आहे.
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 27 - उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा संभाळताच योगी आदित्यनाथ यांनी निर्णयाचा धडाका लावला आहे. योगींना कामकाज संभाळून आठवडा पूर्ण झाला असून, त्यांनी 150 तासात कॅबिनेटच्या बैठकीशिवाय आतापर्यंत 50 निर्णय घेतले आहेत. त्यांच्या अनेक निर्णयाचे कौतुक होत असले तरी, बेकायदा कत्तलखाने बंद करण्याच्या आणि रोमिओ विरोधी पथक स्थापन करण्याच्या निर्णयावरुन वाद निर्माण झाला आहे.
बेकायदा कत्तल खाने बंद करण्याच्या निर्णयाचे राज्यात पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. या निर्णयाविरोधात आजपासून उत्तरप्रदेशातील मटण विक्रेते अनिश्चितकाळासाठी संपावर गेले आहेत. मुलीच्या छेडछाडीच्या घटना रोखण्याबरोबर मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे हा रोमिओ विरोधी पथक स्थापन करण्यामागचा उद्देश आहे.
सरकारी अधिकारी आणि मंत्र्यांनी सकाळी 10 वाजता कार्यालयात पोहोचले पाहिजे. हजेरीसाठी बायोमेट्रीक मशीन्स बसवणे, सरकारी कार्यालयात पानमसाला, गुटख्यावर बंदी या योगीच्या निर्णयाचे कौतुक होत आहे. योगींनी सार्वजनिक बांधकाम खात्याला 15 जूनपर्यंत राज्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाचेही कौतुक होत आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या कंत्राटदारांना हटवून स्वच्छ प्रतिमेचे कंत्राटदार नेमा असे त्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत. फायली घरी घेऊन जाण्यापेक्षा कार्यालयात असतानाच फाईल क्लिअर करा असा सल्ला त्यांनी मंत्री आणि अधिका-यांना दिला आहे. त्यामुळे योगींच्या प्रत्येक निर्णयाची जोरदार चर्चा होत आहे.