अमृतसरमध्ये १५० मराठी कुटुंबांचे बल्ले बल्ले; ‘गलाई’त कमावली विश्वासार्हता  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 08:45 AM2022-02-17T08:45:13+5:302022-02-17T08:45:40+5:30

गलाई किंवा आपल्याकडे ज्याला आटणीचे काम म्हणतात, ते म्हणजे सोन्या-चांदीचे शुध्दीकरण. गुरू बाजार व कित्ता बाजार परिसरात अशी महाराष्ट्रीयन लोकांची दोनशे दुकाने आहेत.

150 Marathi families in Amritsar; Earned credibility in Punjab | अमृतसरमध्ये १५० मराठी कुटुंबांचे बल्ले बल्ले; ‘गलाई’त कमावली विश्वासार्हता  

अमृतसरमध्ये १५० मराठी कुटुंबांचे बल्ले बल्ले; ‘गलाई’त कमावली विश्वासार्हता  

Next

विश्वास पाटील

अमृतसर : सोन्या-चांदीचे गलाईचे काम करण्यात महाराष्ट्रीयन लोकांचे येथे चांगले नाव आहे. या कामांतून मराठी उद्योजकांनी येथे चांगली विश्वासार्हता मिळवली असल्याचे चित्र बुधवारी सराफ बाजारात फिरल्यानंतर अनुभवण्यास मिळाले. महाराष्ट्रातील मुख्यत: सांगली, सातारा जिल्ह्यांतील दीडशेहून अधिक कुटुंबे येथे अगदी सुवर्णमंदिराच्या परिसरातच गेल्या ६०-७० वर्षांपासून स्थायिक आहेत. ते गणेश उत्सव, शिवजयंतीही मोठ्या उत्साहात साजरी करतात.

वेजेगाव (ता. खानापूर) चे नागेश देवकर यांचे या परिसरात मोठे प्रस्थ आहे. आता पोपट यादव हे प्रधान म्हणून ती परंपरा पुढे चालवत आहेत. अशोक जाधव, संजय काशीद, राम देशमुख, प्रशांत घोटकर, संदीप पाटील असे काही प्रमुख लोक या व्यवसायात आहेत. सांगली जिल्ह्यातील मांजर्डी, गवाण, वेजेगाव, बेनापूर, सातारा जिल्ह्यातील मायणी व पुणे जिल्ह्यातील काही गावांतील तरुण या व्यवसायात आहेत. कधीकाळी दुष्काळी पट्ट्यातील हे लोक  रोजगाराच्या शोधात येथे आले आणि आता या व्यवसायात त्यांनी प्रतिष्ठा निर्माण केली आहे.

गलाई किंवा आपल्याकडे ज्याला आटणीचे काम म्हणतात, ते म्हणजे सोन्या-चांदीचे शुध्दीकरण. गुरू बाजार व कित्ता बाजार परिसरात अशी महाराष्ट्रीयन लोकांची दोनशे दुकाने आहेत. हा परिसर जुन्या शहरातील आहे. त्यामुळे देश स्वतंत्र होण्याच्या आधीच्या जुन्या इमारती आहेत. तिथे या लोकांची छोट्या दुकानातून ही कामे चालतात. त्यावरून त्यांचे या शहराशी किती जुने नाते असेल, याची कल्पना येते. सोन्याची शुध्दता तपासणाऱ्या लॅब काही लोकांनी सुरू केल्या आहेत. पंजाबचा व्यापारी सोन्या-चांदीचे शुध्दीकरणाचे काम महाराष्ट्रीयन लोकांकडून करून घेतो. कारण हे काम तो प्रामाणिकपणे करतो, असे सराफ व्यावसायिक हरजित सिंह यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

मतांसाठीही फिल्डिंग
मराठी माणूस नोकरी-व्यवसायासाठी गाव सोडत नाही, अशी पारंपरिक प्रतिमा असताना या लोकांनी मात्र येथे कामातून चांगला दबदबा निर्माण केला आहे. त्यांचे येथे मतदानही आहे. मराठी लोकांची असोसिएशन आहे. या असोसिएशनचा पाठिंबा मिळावा, यासाठी काँग्रेस व भाजपकडून प्रयत्न केला जात असल्याचे पाहायला मिळाले. हे लोक चांगले पंजाबी बोलतात. स्वत:ची घरे आहेत. या मातीशी ते एकरूप झाले आहेत.

Web Title: 150 Marathi families in Amritsar; Earned credibility in Punjab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.