१५०० हिंदूंनी भारत सोडला; पाकिस्तानात परत गेले, PM मोदी-शाहांनी केली घोर निराशा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 05:23 PM2022-08-22T17:23:43+5:302022-08-22T17:24:39+5:30
मोदी सरकार येण्यापूर्वी १३ हजार लोकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले होते. मात्र, गेल्या ५ वर्षांत २ हजार पाकिस्तानी हिंदूना भारतीय नागरिकत्व मिळाले, असे सांगितले जात आहे.
नवी दिल्ली: भारतीय नागरिकत्व मिळेल या आशेने आलेल्या हिंदूंवर पुन्हा पाकिस्तानात परतण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानातून आलेल्या शरणार्थींना भारतीयांना नागरिकत्व मिळवताना अडचणी येत आहेत. केंद्र सरकारचे नियम अतिशय कठोर आहेत. त्यामुळे पाकिस्तानातील अत्याचारांना कंटाळून भारतात आलेले हिंदू पुन्हा पाकिस्तानला परतत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये ३३४ पाकिस्तानी हिंदू शरणार्थी मायदेशात परत गेले असून, गेल्या दोन वर्षांतील ही संख्या १५०० च्या घरात असल्याचे सांगितले जात आहे.
उच्चपदस्थांच्या माहितीनुसार, जानेवारी ते जुलै २०२२ या कालावधीत ३३४ पाकिस्तानी हिंदू शरणार्थी पाकिस्तानला परत गेले. २०२१ पासून या वर्षीपर्यंत जवळपास १५०० पाकिस्तानी हिंदू पाकिस्तानला परत गेले आहेत, अशी माहिती सीमांत लोक संघटनेचे अध्यक्ष हिंदू सिंह सोधा यांनी दिली. पाकिस्तानातून आलेल्या अनेक हिंदूंकडे पैसा किंवा संसाधने नाहीत. त्यामुळे त्यांना भारतीय नागरिकत्व मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे ते पाकिस्तानला परत जात आहेत, असे त्यांनी सांगितले. राज्य आणि केंद्र सरकारच्या कारभारामुळे पाकिस्तानातून आलेल्या हिंदूंच्या पदरी निराशा आल्याचेही ते म्हणाले.
भारतीय नागरिकत्वासाठी २५ हजार पाकिस्तानी हिंदू प्रतिक्षेत
पैसे खर्च करूनही भारतीय नागरिकत्व मिळेल याची खात्री नाही. भारतीय नागरिकत्व हव्या असलेल्या पाकिस्तानी हिंदूंची संख्या जवळपास २५ हजार इतकी आहे. गेल्या १० ते १५ वर्षांपासून हे पाकिस्तानी हिंदू भारतात राहत आहेत, असे सोधा म्हणाले. २००४ आणि २००५ मध्ये जवळपास १३ हजार पाकिस्तानी हिंदूंना नागरिकत्व देण्यासाठी कॅम्प आयोजित करण्यात आले होते. त्यांना नागरिकत्वही मिळाले. मात्र गेल्या ५ वर्षांत केवळ २ हजार पाकिस्तानी हिंदूंनाच नागरिकत्व मिळाले.
दरम्यान, पाकिस्तानातून भारतात आलेल्या हिंदूंना भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागते. भारतीय गृह मंत्रालयाच्या नियमांनुसार, नागरिकत्वासाठी अर्ज करताना नुतनीकरण करण्यात आलेला पासपोर्ट आणि पासपोर्ट सरेंडर करत असल्याचे पाकिस्तानी दूतावासाचं प्रमाणपत्र जमा करावं लागते. पाकिस्तानी दूतावासानं पासपोर्ट नुतनीकरणाच्या शुल्कात वाढ केली आहे. त्यामुळे खर्च वाढला आहे.