आसाममध्ये मंदिरातील पुजाऱ्यांना 15,000 सहायता निधी, महाराष्ट्रातही होतेय मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 06:47 PM2021-08-25T18:47:39+5:302021-08-25T18:53:06+5:30

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी कोरोनाबाधित राज्यातील हिंदू पुजारी आणि छोट्या मंदिरांना 15 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय कौतुकास्पद असल्याचे समितीचे राज्य समन्वयक शंभू गवारे यांनी म्हटलंय.

15,000 assistance fund for priests in Assam, also in Maharashtra for temple | आसाममध्ये मंदिरातील पुजाऱ्यांना 15,000 सहायता निधी, महाराष्ट्रातही होतेय मागणी

आसाममध्ये मंदिरातील पुजाऱ्यांना 15,000 सहायता निधी, महाराष्ट्रातही होतेय मागणी

Next
ठळक मुद्देराज्यातील देवस्थान ट्रस्ट फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विजय पोरे आणि सचिव हणमंतराव क्षीरसागर यांनीही राज्यातील मंदिरे खुली करण्याची मागणी केली आहे

 कोरोना महामारीमुळे देशातील प्रार्थनास्थळे गेल्या 1.5 वर्षांपासून बंदच आहेत. मंदिरे बंद असल्याने तेथील पुजारी व पुरोहितांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यामुळे, पुजाऱ्यांनाही सरकारने सहायता निधी द्यावा, अशी मागणी करण्यात येत होती. आसाम सरकारने राज्यातील मंदिरांच्या पुजाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील मंदिरांतील पुजाऱ्यांना 15,000 रुपये देण्याचा निर्णय आसाम सरकारने जाहीर केला. हिंदू जनजागृती समितीने या निर्णयाचं स्वागत केलं आहे. 

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी कोरोनाबाधित राज्यातील हिंदू पुजारी आणि छोट्या मंदिरांना 15 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय कौतुकास्पद असल्याचे समितीचे राज्य समन्वयक शंभू गवारे यांनी म्हटलंय. महाराष्ट्रातही गेल्या 1.5 वर्षांपासून मंदिरे बंद आहेत. त्यामुळे, हिंदू जनजागृती समितीने महाराष्ट्रातील पुजाऱ्यांनाही 15 हजार रुपये सहायता निधी देण्याची मागणी केली आहे. मंदिरे बंद असल्याने तेथील लहान-सहान उद्योग ठप्प झाले आहेत. तर, मंदिरातील पुजाऱ्यांचेही आर्थिक गणित कोलमडलंय. त्यामुळे, मंदिरे खुली करण्याची मागणीही सातत्याने होत आहे. 

दरम्यान, राज्यातील देवस्थान ट्रस्ट फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विजय पोरे आणि सचिव हणमंतराव क्षीरसागर यांनीही राज्यातील मंदिरे खुली करण्याची मागणी केली आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांची सातारा येथील निवासस्थानी भेट घेवून देवस्थान मंदिरे उघडण्याची व समस्त पुजारी (गुरव) समाजाला मानधन मिळावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. 

मनसेचीही मंदिरं खुली करण्याची मागणी

केवळ मंदिरे उघडल्याने कोरोनाचा प्रसार होतो असे कोणत्या सर्वेक्षणात आले आहे का? मंदिरे हा केवळ भावनेचा नव्हे तर अनेक शहरांच्या अर्थकारणाचा विषय आहे. त्वरित सर्व मंदिरे उघडण्याचा निर्णय सरकारने घ्यावा. तसेच, जशी नियमावली सगळ्यांना लागू होते तशीच इथेही लागू करावी, अशी मागणी नांदगावकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे, राज्यातील प्रार्थनास्थळे कधी उघडणार, तेथील अर्थकारण कधी सुरू होणार, मुख्यमंत्री कधी भूमिका घेणार हेच पाहावे लागणार आहे.   

देवेंद्र फडणवीसांनीही केली होती मागणी

देवेंद्र फडणवीस हे सांगोल्यात दिवंगत नेते माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्याघरी सांत्वनपर भेटीसाठी गेले होते. त्यावेळी, पंढरपूर येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना, त्यांनी मंदिरे खुली करण्याची मागणी केली. आम्ही हिंदू आहोत, आमचे 36 कोटी देव आहेत, दगडातही आमचा देव आहे. 'मॉल, बारमध्ये जितकी गर्दी होते, त्यापेक्षा कमी गर्दी ही मंदिरात होते. दारूची दुकानंही सुरू आहेत. खरे तर सामाजिक अंतराचे निकष पाळून मंदिरं सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने तातडीने घेतला पाहिजे. अनेक गरिबांची उपजिविका त्यावर आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. 

Web Title: 15,000 assistance fund for priests in Assam, also in Maharashtra for temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.