CoronaVirus : अमेरिकेत मृत्यूचे तांडव सुरूच, एकाच दिवसात 1514 जणांचा मृत्यू; इटलीलाही टाकले मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 05:47 PM2020-04-13T17:47:58+5:302020-04-13T17:59:25+5:30
संपूर्ण जगात कोरोनामुळे 18 लाखहून अधिक लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. तर जगातील मृतांचा आकडा 1 लाखहून अधिक आहे. कोरोनाने महासत्ता म्हणवणाऱ्या अमेरिकेला पार हतबल करून टाकले आहे. येथे कोरोना बाधितांची संख्या 5 लाख हून अधिक आहे. कोरोनामुळे जगात सर्वाधिक मृत्यू अमेरिकेतच झाले आहेत.
वॉशिंग्टण : संपूर्ण जगात हाहाकार घातलेल्या कोरोनाने अमेरिकेत मृत्यूचे तांडव सुरू केले आहे. गेल्या एक दिवसात येथे कोरोनाने तब्बल 1514 जणांचा बळी घेतला. या बळींबरोरच अमेरिकेतील एकूण मृतांचा आकडा आता 22 हजारवर पोहोचला आहे. मृतांच्या बाबतीत अमेरिकेने इटलीलाही मागे टाकले आहे. कोरोनामुळे इटलीत आतापर्यंत 19,899 जणांचा मृत्यू झाला आहे.
संपूर्ण जगात कोरोनामुळे 18 लाखहून अधिक लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. तर जगातील मृतांचा आकडा 1 लाखहून अधिक आहे. कोरोनाने महासत्ता म्हणवणाऱ्या अमेरिकेला पार हतबल करून टाकले आहे. येथे कोरोना बाधितांची संख्या 5 लाख हून अधिक आहे. कोरोनामुळे जगात सर्वाधिक मृत्यू अमेरिकेतच झाले आहेत.
अमेरिकेनंतर स्पेनमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. येथील रुग्णांचा आकडा आता 1 लाख 66 हजारवर गेला आहे. इटलीत 1 लाख 56 हजार तर फ्रान्समध्ये 1 लाख 32 हजार कोरोना रुग्ण आहेत. स्पेनमध्ये कोरोनामुळे रोज होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी झाली असली तरी येथे सोमवारीही 517 जणांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत तेथे 17,500 जणांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये आता अर्थव्यवस्थेशी संबंधित काही क्षेत्रांतील कामांनाही सुरुवात करण्यात आली आहे. तेथे काही क्षेत्रांतील लोक पुन्हा कामावर जाऊ लागले आहेत.
इंग्लंडमध्ये मृतांचा आकडा 10 हजारांवर
इंग्लंडमध्ये कोरोना बाधितांची संख्या 84 हजारवर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा 10 हजारांवर गेला आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत 14 हजारहून अधिक, तर जर्मनीत 3 हजार हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या 24 तासांत केवळ दोन जणांचा मृत्यू -
जेथून कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली त्या चीनमध्ये कोरोना संसर्गावर बऱ्यापैकी अटकाव घातला गेला आहे. तेथे गेल्या 24 तासांत केवळ दोन जणांचा मृत्यू झाला. मात्र तेथील मृतांची संख्या 3 हजार 350पर्यंत पोहोचली आहे. इराणमध्येही कोरोनाबाधितांच्या मृत्यूंचे प्रमाण कमी होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीतून दिसते. अर्थात तिथेही मृत्यूंचा आकडा जवळपास 5 हजारांच्या जवळ पोहोचला आहे. म्हणजेच जगात आतापर्यंत झालेल्या मृत्युंपैकी सुमारे 80 हजार मृत्यू याच सात देशांमध्ये झाले आहेत. बेल्जियम आणि नेदरलँड या दोन देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण व मृत यांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे.
भारतात एकूण 20 टक्के रुग्ण गंभीर आहेत -
भारतात रुग्णसंख्या वाढत असली तरी गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी आहे. त्यांच्यावर उपचारासाठी रुग्णालये सज्ज असून अशा रुग्णांच्या तुलनेत बेड, आयसीयू व व्हेंटिलेटरची संख्या खूप जास्त असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली. सद्य:स्थितीत एकूण 20 टक्के रुग्ण गंभीर आहेत. अशांची संख्या 1 हजार 671 आहे. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते आहे. एकूण 716 रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत.