गुजरात निवडणुकीत 154 नरेंद्र मोदी करणार मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2017 03:49 PM2017-11-01T15:49:42+5:302017-11-01T15:51:11+5:30
गुजरात निवडणुकीत 154 नरेंद्र मोदी मतदान करणार आहेत. गुजरात निवडणुकीसाठी मतदान करणा-या 154 मतदारांचं नाव नरेंद्र मोदी आहे. या 154 नावांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समावेश आहे.
अहमदाबाद - नावात काय आहे? असा सवाल शेक्सपिअरने विचारला होता. पण पुढील दिवसांमध्ये नाव हे एक ब्रॅण्ड होईल याची कल्पना कदाचित शेक्सपिअरला नव्हती. भाजपाने अनेकदा निवडणुकीत मोदी ब्रॅण्डचा वापर केला असून, त्याचा निकालही समोर आला आहे. यावेळी गुजरात निवडणुकीतदेखील असंच काहीसं चित्र दिसणार आहे. यावेळी गुजरात निवडणुकीत 154 नरेंद्र मोदी मतदान करणार आहेत. गुजरात निवडणुकीसाठी मतदान करणा-या 154 मतदारांचं नाव नरेंद्र मोदी आहे. या 154 नावांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समावेश आहे.
गुजरात निवडणुकीत यावेळी पंतप्रधान मोदींच्या डुप्लिकेटची मागणीही जोरात आहे. सोबतच ज्यांचं नाव नरेंद्र मोदी आहे, ते लोकदेखील आम्हाला अभिमान असल्याचं सांगत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत एकूण 154 नरेंद्र मोदी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एक वेळ होती जेव्हा राजकीय पक्ष मतदारांचा गोंधळ करण्यासाठी रणनीतीचा भाग म्हणून एकाच नावाचे उमेदावर उभे करत असत. पण आता तर मतदारांचं नाव सारखं असल्याने गोंधळ उडालेला दिसत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव अहमदाबाद जिल्ह्याच्या मतदार यादीत आहे. याच यादीत नरेंद्र मोदी नाव सर्वात जास्त वेळा आहे. अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत एकूण 49 नरेंद्र मोदींचं नाव मतदारांच्या यादीत आहे. यादीत मेहसाना दुस-या क्रमांकाचा जिल्हा आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, तेथील मतदार यादीत नरेंद्र मोदी नावाचे 24 मतदार आहेत. भरुच जिल्हा यामध्ये तिस-या क्रमांकावर असून, सुरत चौथ्या क्रमांकावर आहे. भरुचमध्ये 16 तर सुरतमध्ये 15 नरेंद्र मोदी मतदान करणार आहेत.
उत्तर गुजरातमधील पाटन आणि मेहसाना जिल्ह्यातदेखील नरेंद्र मोदी नावाचे मतदार आहेत. पाटन येथे 13 तर बनसकंठा येथे 11 मतदार आहेत. तर दुसरीकडे सबरकंठा, गांधीनगर और बडोदा येथे अनुक्रमे 7,6,6 मतदार आहेत.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली आहे. राज्यात दोन टप्प्यांत मतदान केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 9 डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्यात 14 डिसेंबरला मतदान होणार आहे. गुजरातचा निकाल हिमाचल प्रदेशसोबत १८ डिसेंबर रोजी लागणार आहे. आदर्श निवडणूक आचारसंहिता गुजरातबरोबर केंद्र सरकारलाही लागू झाली आहे.