चीन-पाकिस्तान सीमेवर १५६ ‘प्रचंड’ हेलिकॉप्टर; हवाई दलाने केंद्र सरकारकडे सादर केला खरेदी प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 08:28 AM2023-10-02T08:28:32+5:302023-10-02T08:28:42+5:30
भारतीय हवाई दल हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडकडून (एचएएल) आणखी १५६ ‘प्रचंड’ लढाऊ हेलिकॉप्टर खरेदी करणार आहे.
नवी दिल्ली : भारतीय हवाई दल हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडकडून (एचएएल) आणखी १५६ ‘प्रचंड’ लढाऊ हेलिकॉप्टर खरेदी करणार आहे. भारतीय हवाई दल त्यांना चीन आणि पाकिस्तान सीमेवर तैनात करणार आहे. त्यामुळे दोन्ही सीमेवरील सुरक्षाव्यवस्था मजबूत होण्यास मदत होईल.
जगातील सर्वात खराब हवामान आणि भूप्रदेशात चाचणी घेतल्यानंतर, गेल्या १५ महिन्यांत १५ हेलिकॉप्टर आधीच लष्कराच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आले आहेत. भारतीय लष्कर आणि हवाई दलाची आवश्यकता लक्षात घेता भारतीय हवाई दलाने, मुख्य सेवा म्हणून, संयुक्त अधिग्रहण प्रकरण म्हणून आणखी १५६ प्रचंड हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा प्रस्ताव सरकारला सादर केला आहे, जो लवकरच मंजूर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.
‘मार्क १ ए’चीही होईल खरेदी
हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी १०० हलके लढाऊ विमान ‘मार्क १ ए’ खरेदी करण्याचा मनोदय जाहीर केला होता. १५६ प्रचंड हेलिकॉप्टरपैकी ६६ भारतीय हवाई दल, तर उर्वरित ९० भारतीय लष्कर ताब्यात घेणार आहेत.
५००० मीटर उंचीवर लँड
हे लढाऊ हेलिकॉप्टर वाळवंटी प्रदेश आणि अधिक उंचीच्या भागात काम करण्यासाठी तयार केले गेले आहे.
प्रचंड हे जगातील एकमेव लढाऊ हेलिकॉप्टर आहे जे ५००० मीटर उंचीवर टेक ऑफ, लँड करू शकते.
‘प्रचंड’ हवेतून जमिनीवर आणि हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे डागण्यास सक्षम आहे.
‘अदृश्य’ मार्ग देईल चीनला आव्हान
लेह : भारतीय सैन्याकडून चीन सीमेजवळील एलएसीवर उत्तरेकडील लष्करीतळापर्यंत रस्ता बांधला जात आहे. हा रस्ता केवळ भारताच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा तर आहेच, शिवाय हा रस्ता चीनला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून (एलएसी) दिसणार नाही. त्यामुळे नवीन रस्ता भारतीय सैन्याची आघाडीची फळी मजबूत करण्यासाठी सैन्य, शस्त्रे आणि रसद हालचालीसाठी वापरला जाईल.
भारत चीनसोबतच्या एलएसीवर स्थित ‘दौलत बेग ओल्डी’पर्यंतच्या (डीबीओ) लष्करीतळापर्यंतचा रस्ता प्रकल्प पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सासोमा येथून सुरू होणारा हा नवीन रस्ता सैन्य आणि उपकरणांच्या हालचालीसाठी सुरक्षित पर्याय उपलब्ध करून देईल.