भारत-रशिया यांच्यात १६ करार
By Admin | Published: October 16, 2016 01:09 AM2016-10-16T01:09:33+5:302016-10-16T01:09:33+5:30
भारत आणि रशिया यांनी अनेक मोठ्या संरक्षण करारांवर शनिवारी स्वाक्षऱ्या केल्या. त्यानुसार भारत रशियाकडून क्षेपत्रास्त्र यंत्रणेची खरेदी करेल. तसेच दोन्ही देश
बेनॉलिम (गोवा) : भारत आणि रशिया यांनी अनेक मोठ्या संरक्षण करारांवर शनिवारी स्वाक्षऱ्या केल्या. त्यानुसार भारत रशियाकडून क्षेपत्रास्त्र यंत्रणेची खरेदी करेल. तसेच दोन्ही देश मिळून फ्रिगेटस् आणि लष्करी हेलिकॉप्टरांचे संयुक्तरीत्या उत्पादन करतील. याशिवाय विविध क्षेत्रांतील सहकार्य आणखी मजबूत करण्याचा तसेच दहशतवादाचा संयुक्तपणे मुकाबला करण्याचा निर्णयही दोघांनी घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी व्यापक चर्चा केल्यानंतर दोन्ही देशांनी एकूण १६ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. याशिवाय तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या. दोन्ही नेत्यांनी कुडनुलम अणुऊर्जा प्रकल्पातील एका युनिटचे लोकार्पण केले. लष्करी करारानुसार भारत रशियाकडून गेमचेंजर एस-४00 ट्रायंफ हवाई सुरक्षा यंत्रणा विकत घेणार आहे. तिची किंमत ५ अब्ज डॉलर आहे. दोन्ही देश मिळून ४ अत्याधुनिक फ्रिगेटची बांधणी करणार आहेत, तसेच कामोव्ह हेलिकॉप्टरसाठी निर्मिती प्रकल्प उभारणार आहेत.
पुतीन यांच्या उपस्थितीत मोदी यांनी यासंबंधीचे निवेदन केले. भारताने सीमापार दहशतवादाच्या मुद्यावर केलेल्या कृतीला दिलेल्या समर्थनाबद्दल मोदी यांनी रशियाची प्रशंसा केली. भारताच्या सर्जिकल स्ट्राईकच्या अनुषंगाने हे वक्तव्य मोदी यांनी केले. मोदी यांनी सांगितले की, दहशतवाद आणि त्याला पाठिंबा याबाबत ‘शून्य सहनशीलता’ धोरणाचा आम्ही दोघांनीही पुनरुच्चार केला आहे. पुतीन म्हणाले की, दहशतवादाचा मुकाबला करण्याच्या बाबतीत दोन्ही देशांचे घनिष्ट सहकार्य आहे. (वृत्तसंस्था)
एस्सार आॅईलचे अधिग्रहण
- रशियन सरकारच्या मालकीची कंपनी रॉसनेट व तिच्या भागीदारांनी भारतातील सर्वांत मोठी तेल कंपनी एस्सार आॅईलचे १३ अब्ज डॉलरला अधिग्रहण केले आहे. हा व्यवहार रोखीने झाला आहे.