आम आदमी पक्षाचा जाहिरातींवर दिवसाला 16 लाखांचा खर्च
By admin | Published: May 16, 2016 08:51 AM2016-05-16T08:51:51+5:302016-05-16T08:51:51+5:30
माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार आम आदमी पक्ष सरकार प्रिंट मिडियामध्ये जाहिराती करण्यासाठी दिवसाला 16 लाख रुपये खर्च करत आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 16 - आम आदमी पक्ष सरकार प्रिंट मिडियामध्ये जाहिराती करण्यासाठी दिवसाला 16 लाख रुपये खर्च करत आहे. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत (आरटीआय) ही माहिती मिळाली आहे. आरटीआयमार्फत मिळालेल्या माहितीत आप सरकारने 91 दिवसांत जाहिरातींवर 91 कोटी खर्च केल्याचं समोर आलं आहे. महत्वाचं म्हणजे यामध्ये ब्रॉडकास्टचा सहभाग नाही. काँग्रेस पक्षाचे वकील अमन पवार यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत (आरटीआय) ही माहिती मागवली होती.
दिल्ली सरकारने जाहिराती दिलेल्यांमध्ये तीन मल्ल्याळी आणि एका कन्नड वृत्तपत्राचादेखील समावेश आहे. केरळ आणि कर्नाटकमधील प्रसिद्ध वृत्तपत्र आहे. सार्वजनिक योजनांची माहिती लोकांपर्यत पोहचवण्यासाठी जाहिराती केल्याचं दिल्ली सरकारचं म्हणणं आहे. लोकसभेत बोलताना सम-विषम फॉर्म्युल्याच्या दोन टप्प्यांच्या जाहिरातीसाठी 5 कोटी खर्च केल्याची आम आदमी सरकारने कबुली दिली होती.
2010 मध्ये शीला दिक्षित सरकार सत्तेवर असताना कॉमनवेल्थ गेम्ससाठी 23 कोटी खर्च झाल्यावरुन काँग्रेसवरही टीकेची झोड उठली होती. आम आदमी सरकारने सत्तेत येताच पहिल्या वर्षात 80 कोटींचा खर्च केला आहे. गतवर्षी राज्य अर्थसंकल्पात जाहिरातींसाठी 500 कोटींचं वाटप केल्यावरुन आप सरकारवर जोरदार टीका करण्यात आली होती.
एकीकडे सफाई कर्मचा-यांचा पगार निवृत्तीवेतन देण्यासाठी पैसे नसताना, दुसरीकडे स्वत:च्या प्रसिद्धीसाठी हे पैसे खर्च करत आहेत अशी टीका दिल्ली काँग्रेस प्रमुख अजय माकन यांनी केली आहे.