एफटीआयआयला विद्यार्थ्यामागे १६ लाखांचे अनुदान

By admin | Published: August 9, 2015 01:21 AM2015-08-09T01:21:40+5:302015-08-09T01:21:40+5:30

अभिनेते गजेन्द्र चौहान यांच्या वादग्रस्त नियुक्तीवरून चर्चेत आलेली फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया(एफटीआयआय) या पुण्यातील नामांकित संस्थेत शिकणाऱ्या प्रत्येक

16 lakhs grant for FTII students | एफटीआयआयला विद्यार्थ्यामागे १६ लाखांचे अनुदान

एफटीआयआयला विद्यार्थ्यामागे १६ लाखांचे अनुदान

Next

- हरीश गुप्ता, नवी दिल्ली
अभिनेते गजेन्द्र चौहान यांच्या वादग्रस्त नियुक्तीवरून चर्चेत आलेली फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया(एफटीआयआय) या पुण्यातील नामांकित संस्थेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यामागे सरकार दरवर्षी सुमारे १६ लाख रुपयांचे भरमसाट अनुदान देत आहे. विशेष म्हणजे मेडिकल आणि आयआयटीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यात येणाऱ्या अनुदानापेक्षा एफटीआयआयच्या विद्यार्थ्याला पुरविण्यात येणारे हे अनुदान जवळपास तिप्पट आहे.
सध्या पुण्यातील या संस्थेत २३० विद्यार्थ्यांनी पाच वर्षे कालावधीच्या विविध ११ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला आहे. येत्या ३१ मार्च रोजी संपत असलेल्या २०१४-१५ या आर्थिक वर्षांत सरकारने एफटीआयआयवर ३९.८९ कोटी रुपये खर्च केले आहेत. या काळात संस्थेने २.२८ कोटींचे उत्पन्न मिळवले. ते वजा केल्यास सरकारने चालू आर्थिक वर्षांत या संस्थेवर ३७.६१ कोटी रुपये खर्च केले. याची आकडेमोड केल्यास सरकारने देशभरातील प्रत्येक संस्था, महाविद्यालय आणि व्यावसायिक अभ्याक्रमांच्या प्रत्येक विद्यार्थ्यावर १६ लाख रुपये खर्च करायला हवे. पण प्रत्यक्षात वैद्यकीय महाविद्यालयाला प्रत्येक विद्यार्थ्यामागे दरवर्षी सरकार अंदाजे ६ लाख रुपये अनुदान देते. तर आयआयटीत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यामागे अंदाजे ५ लाखाचे अनुदान देते. अन्य संस्थेतील विद्यार्थ्यांवर इतका कमी खर्च होत असेल तर एफटीआयआयला दरवर्षी इतके प्रचंड अनुदान देण्याचे कारण काय, असा प्रश्न त्यामुळेच खुद्द माहिती व प्रसारण मंत्री अरुण जेटली यांना पडला.
इतर कुठल्याही व्यावसायिक अभ्यासक्रमाला अन्यत्र इतके प्रचंड अनुदान दिले जात नसताना, एफटीआयआयवरच सरकारची इतकी कृपादृष्टी का, हा प्रश्न त्यामुळेच सरतेशेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दरबारी पोहोचला. यानंतर एफटीआयआय भाड्याने देण्याची किंवा त्याचे पूर्णत: खासगीकरण करण्याचा विचार सरकारच्या डोक्यात चमकून गेला.
अर्थात नंतर हा विचार मागे ठेवला गेला व आता या संस्थेच्या व्यवस्थापनात बदल करण्याचा निर्णय विचाराधीन आहे. गुरुवारी एका अतारांकित प्रश्नाच्या उत्तरादाखल सरकारने याबाबतचे संकेत दिले. एफटीआयआय आणि सत्यजित राय फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, कोलकाता या दोन्ही संस्थांना राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था घोषित करण्याचा प्रस्ताव असल्याचे सरकारने या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

एफटीआयआयला दिलेले अनुदान आणि संस्थेचे उत्पन्न (कोटीत)
वर्ष निधी निधी एकूण मिळालेले उत्पन्न
(योजनेअंतर्गत) (बिगर योजनेअंतर्गत )
२०१२-१३ ०.३० १७.८४ १८.१४ २.८४
२०१३-१४ १५.४५ १९.२७ ३४.७२ २.६१
२०१४-१५ १९.४५ २०.४४ ३९.८९ २.२८

Web Title: 16 lakhs grant for FTII students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.