16 महिन्यामध्ये 19 वेळा गॅस सिलिंडरच्या दरात झाली वाढ, सर्वसामान्यांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2017 10:08 AM2017-11-02T10:08:56+5:302017-11-02T10:12:26+5:30
सरकारने अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 4 रूपये 50 पैशांनी वाढ केली आहे. विनाअनुदानित सिलिंडरचे दरही वाढवण्यात आले आहेत.
नवी दिल्ली- सरकारने अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 4 रूपये 50 पैशांनी वाढ केली आहे. विनाअनुदानित सिलिंडरचे दरही वाढवण्यात आले आहेत. आता विनाअनुदानित सिलिंडरसाठी 93 रूपये जास्त द्यावे लागणार आहेत. त्याचबरोबर जेट इंधनच्या किंमतीतही 2 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. यामुळे गृहिणींचं महिन्याचं बजेट कोलमडणार आहे. इतकंच नाही, तर विमानाचं तिकीटही महाग होणार आहेत. जुलै 2016 नंतर सरकारने 19 वेळा सिलिंडरच्या किंमतीत वाढ केली आहे.
गेल्यावर्षी जुलै महिन्यामध्ये सरकारने प्रत्येक महिन्यात किंमत वाढवून गॅस सिलिंडरवर देण्यात येणारं अनुदान संपवण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून आतापर्यंत 19 वेळा किंमतीत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार घरगुती अनुदानित 14.2 किलोग्रॅमचा एक सिलिंडर 495 रूपये 69 पैशांना मिळेल. विनाअनुदानित सिलिंडरच्या किंमतीत 93 रूपयांची वाढ होऊन त्याची किंमत आता 742 रूपये झाली आहे. यापूर्वी एक ऑक्टोबर रोजी यामध्ये 50 रूपयांची वाढ करून त्याची किंमत 649 रूपये करण्यात आली.
गेल्या वर्षी सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांना प्रत्येक महिन्यात दरांमध्ये वाढ करायला सांगितलं होतं. पुढील मार्च महिन्यापर्यंत अनुदान संपवण्यासाठी सरकारने तशा सूचना दिल्या होत्या. हे धोरण लागू करायला सुरूवात केल्यापासून अनुदानित सिलिंडरच्या दरात आतापर्यंत 76 रूपये 51 पैशांनी वाढ झाली आहे. जून 2016 मध्ये याची किंमत 419 रूपये 18 पैसा इतकी होती.
सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांची अधिसूचनेनुसार विमान इंधनच्या किंमतीत दोन टक्क्यांनी वाढ केली. ऑगस्टपासून ते आत्तापर्यंत किंमतीमध्ये लागोपाठ चारवेळा वाढ करण्यात आली. पेट्रोलियम कंपन्यांच्या अनुसार विमान इंधनाची दिल्लीमध्ये किंमत 54,143 रूपये प्रति किलोलीटर झाली आहे. आधीची किंमत 53,045 रूपये प्रति किलोलीटर होती. म्हणजेत आताची किंमत 1098 रूपयांनी अधिक आहे.
सरकारी पेट्रोलियम कंपन्या प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला एलपीजी आणि एटीएफ (विमान इंधन) किंमतीत बदल करतात. मागील महिन्यातील तेलाची सरासरी किंमत आणि विदेशी मुद्रा विनिमय दरावर हे अवलंबून असतं.