चीन सीमेकडे निघालेला लष्कराचा ट्रक दरीत कोसळला, १६ जवान शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 05:34 AM2022-12-24T05:34:16+5:302022-12-24T05:34:52+5:30
सिक्कीममध्ये भीषण दुर्घटना, वळणावरील तीव्र उताराने केला घात, मृतांत ३ अधिकारी
नवी दिल्ली : उत्तर चीनच्या सीमेवरील चौकीकडे जवानांना घेऊन निघालेला लष्कराचा ट्रक उत्तर सिक्कीममधील झेमा येथे घाटात वळण घेतानाट्रक उतारावरून घसरल्याने दरीत कोसळला. या भीषण अपघातात तीन कनिष्ठ अधिकाऱ्यांसह १६ जवान मृत्युमुखी पडले. या दुर्दैवी अपघातामुळे देशभर शोक व्यक्त करण्यात येत आहे.
लष्कराची तीन वाहने शुक्रवारी सकाळी जवानांना घेऊन जात होती. हा ताफा चांटे येथून थांगूच्या दिशेने निघाला होता. झेमा येथील घाटात वळण घेताना एक ट्रक तीव्र उतारावरून घसरून दरीत कोसळला. बचाव मोहीम तत्काळ सुरू करण्यात आली. चार जखमी जवानांना हेलिकॉप्टरने दरीतून बाहेर काढण्यात आले.
संरक्षणमंत्र्यांच्या शोक संवेदना
- दुर्दैवाने या दुर्घटनेत ३ कनिष्ठ अधिकारी आणि १३ सैनिकांचा मृत्यू झाला. या दुःखाच्या प्रसंगी भारतीय लष्कर शोकाकुल कुटुंबांसोबत आहे,’ असे लष्कराने म्हटले.
- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ‘त्यांच्या सेवेबद्दल व वचनबद्धतेबद्दल देश मनापासून कृतज्ञ आहे. शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या संवेदना’, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
- जिथे हा ट्रक कोसळला तो भाग चीन सीमेपासून अगदी जवळ आहे. अवघड वळणे आणि तीव्र उतार यामुळे येथून वाहने चालवणे अवघड असते.
सिक्कीमधील दुर्दैवी अपघातात देशाने काही जवानांना गमावले. मृतांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमी झालेले जवान लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान