नवी दिल्ली : प्रद्युम्नसारखंच आणखी एक हत्याकांड, प्रख्यात शाळेच्या बाथरुममध्ये आढळला विद्यार्थ्याचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2018 08:18 AM2018-02-02T08:18:22+5:302018-02-02T09:14:44+5:30
राजधानी नवी दिल्लीमध्ये गुरुग्रामच्या रेयान स्कूलमधील प्रद्युम्न हत्याकांड सारखं एक प्रकरण समोर आले आहे.
नवी दिल्ली - राजधानी नवी दिल्लीमध्ये गुरुग्रामच्या रेयान स्कूलमधील प्रद्युम्न हत्याकांड सारखं एक प्रकरण समोर आले आहे. दिल्लीतील सादतपूर येथील इंटर कॉलेज जीवन ज्योती स्कूलमध्ये 16 वर्षांच्या विद्यार्थ्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. मृत पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव तुषार असून तो इयत्ता नववीतील विद्यार्थी होता. तुषारचा मृतदेह शाळेतील बाथरुममध्ये संशयास्पदरित्या आढळला. तुषार आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता, या घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हे प्रकरण प्रद्युम्न हत्याकांड प्रमाणे असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. प्रद्युम्न हत्याकांडप्रमाणेच तुषारचाही मृतदेह बाथरुममध्ये आढळून आला आहे. सकाळच्या सुमारास शाळेत होणा-या प्रार्थनेच्या वेळेदरम्यान त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
तुषारच्या नातेवाईकांनी सांगितले की, तुषार नेहमीप्रमाणे गुरुवारीदेखील सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास शाळेसाठी जाण्यास घराबाहेर पडला. यानंतर तुषार अचानक बेशुद्ध पडल्याची माहिती शाळेतून त्याच्या घरातल्यांना देण्यात आली. सुरुवातीला तुषारला जवळील मावी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, तेथून पुढे त्याला जीटीबी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले, मात्र त्यापूर्वीच तुषारचा मृत्यू झाला होता. जीटीबी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तुषारच्या मृत्यूमुळे संतापलेल्या त्याच्या नातेवाईकांना शाळेला घेराव घातला. ''शाळा प्रशासनानं तुषारच्या मृत्यूचं सत्य लपवून ठेवलं, कारण त्याचा मृत्यू शाळेतच झाला होता'', असा आरोप नातेवाईकांना केला आहे.
दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तुषारचा मृतदेह शाळेतील बाथरुममध्ये संशयास्पदरित्या आढळून आला. मात्र, त्याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा आढळलेल्या नाहीत. या प्रकरणाची सखोल चौकशी करत असल्याचंही पोलिसांनी सांगितले आहे.