जय श्रीराम म्हणण्यास नकार दिल्यानं मुस्लिम मुलाला जबर मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 07:43 AM2019-06-30T07:43:16+5:302019-06-30T07:44:55+5:30
पुन्हा एकदा जमावाकडून मारहाण; हल्लेखोरांचा शोध सुरू
कानपूर: जय श्रीराम म्हणण्यास नकार दिल्यानं 16 वर्षीय मुलाला मारहाण करण्यात आल्याची घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये घडली. बर्रामध्ये राहणारा मोहम्मद ताज शनिवारी नमाज अदा करून परतत होता. त्यावेळी त्याला काही अज्ञात व्यक्तींनी मारहाण केली. या प्रकरणी सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.
सोळा वर्षांचा मोहम्मद ताज शनिवारी नमाज अदा करण्यासाठी किडवाई नगरमध्ये गेला होता. नमाज अदा करुन परतत असताना दुचाकीवरुन जाणाऱ्या तीन-चार जणांनी मोहम्मदला अडवलं. ओव्हरटेक केल्याच्या कारणावरुन अज्ञातांनी मोहम्मदसोबत वाद घातला. त्यानंतर त्यांनी मोहम्मदच्या डोक्यावर असलेल्या टोपीवर आक्षेप घेतला, अशी माहिती बर्रा पोलीस ठाण्याचे अधिकारी सतीश कुमार सिंह यांनी दिली.
अज्ञातांनी मोहम्मदला जय श्रीराम म्हणण्यास सांगितलं. मात्र त्यानं नकार दिला. यानंतर त्यांनी मोहम्मदला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. 'त्यांनी माझ्या डोक्यावरील टोपी काढली. मला जमिनीवर ढकलून दिलं आणि जय श्रीराम म्हणण्यास सांगितलं. त्यानंतर मला प्रचंड मारहाण केली,' असं मोहम्मदनं पीटीआयला सांगितलं. या परिसरात टोपी घालण्यास मनाई असल्याचं अज्ञातांनी म्हटल्याचंही मोहम्मद म्हणाला.
अज्ञातांकडून मारहाण सुरू असताना सुरुवातीला कोणीच मदत केली नाही, अशी व्यथा मोहम्मदनं मांडली. 'आधी मी दोन दुकानदारांकडे मदतीसाठी याचना केली. मात्र त्यांनी नकार दिला. त्यानंतर काही वाटसरु माझ्या मदतीला धावले. त्यांना पाहताच अज्ञातांनी पळ काढला,' अशी आपबिती मोहम्मदनं सांगितली. या प्रकरणी कलम 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. सध्या पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.