धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून जिवंत जाळलं, 14 जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2018 04:48 PM2018-05-05T16:48:48+5:302018-05-05T16:48:48+5:30
याप्रकरणी 14 जणांना अटक केली असून चार जणांचा अजूनही शोध सुरू आहे.
रांची- 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहित बलात्कार करून तिला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना झारखंडमधील चतरा जिल्ह्याचील राजतेंडुवा गावात घडली आहे. याप्रकरणी 14 जणांना अटक केली असून चार जणांचा अजूनही शोध सुरू आहे.
पीडित मुलगी तिच्या कुटुंबातील एका विवाह सोहळ्यासाठी जात असताना नरधमांनी तिला गाठत शेजारच्या जंगलात नेलं व तिथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला.
जीपी अनिश बत्रा यांच्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच गावच्या पंचांनी या घटनेतील दोषींना प्रत्येकी ५० हजारांचा दंड ठोठावला. दंड ठोठावल्याचा राग मनात धरून हे नराधम पीडित मुलीच्या घरी गेले. घरात बळजबरीने घुसून त्यांनी पीडित मुलीला जिवंत जाळलं. यानंतर गुन्हेगारांनी तेथून पळ काढला. दरम्यान, पोलिसांच्या हातून निसटलेल्यांचा शोध घेण्यासाठी ठिकठिकाणी पोलिसांकडून धाडी टाकल्या जात आहेत.
दरम्यान, झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. झारखंडमध्ये जे घडलं ते अतिशय धक्कादायक आहे. अशा भयानक कृत्यांना समाजात जागा नाही, असं ते म्हणाले. या घटनेतील दोषींना वाचवलं जाणार नाही, असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री रघुबर दास यांनी घटनेत दोषी असलेल्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले असून त्यांच्याविरोधात कठोरात कठोर पावलं उचलण्याचे आदेश दिले आहेत.
या भयानक प्रकारामुळे झारखंडमध्ये खळबळ उडाली असून, पोलिसांनी शनिवारपर्यंत मुख्य आरोपीसह १४ जणांना अटक केली आहे. अंगावर काटा आणणारा हा प्रकार असून, त्या मुलीच्या आई-वडिलांनाही नराधमांनी मारहाण केल्याचे उघडकीस आले आहे. सदर मुलगी आपल्या चुलत बहिणीच्या लग्नासाठी गेली होती. तेथून परतत असताना तिच्या गावातील चार जणांनी तिला अडवले आणि तिच्यावर सामूहित बलात्कार केला. चतरा जिल्ह्यातील इटखोरी तालुक्यातील राजा केंदुआ गावाच्या बाहेर हा प्रकार घडला.
त्यानंतर, मुलगी रात्री घरी परतली आणि रडतच तिने हा प्रकार घरच्यांना सांगितला. त्यांनी शुक्रवारी गावप्रमुखाला याची माहिती देताच, गाव पंचायत बोलावण्यात आली. त्या चारही जणांना १00 उठाबशा काढण्याची शिक्षा ठोठावण्यात आली आणि त्यांनी मिळून मुलीच्या कुटुंबीयांना ५0 हजार रुपये देऊ न हे प्रकरण मिटवावे, असा निर्णय गाव पंचायतीने दिला.
केलेल्या तक्रारीचा राग आलेले चौघे नंतर मुलीच्या घरात घुसले आणि त्यांनी तिला जिवंत जाळले, तसेच आई-वडिलांनाही बेदम मारहाण केली. या प्रकरणात गावप्रमुखासह पंचायतीचे सदस्य व इतर अशा १४ जणांना शनिवारी अटक करण्यात आली. मुलीच्या शवविच्छेदनाचा अहवाल येण्याची आम्ही वाट पाहत आहोत, असे पोलिसांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
फाशीवर लटकवा
गुंटूर : महिलांचे लैगिंक शोषण करणाऱ्यांना फाशीवरच लटकवण्यात यावे, असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले. गुंटूरमधील बलात्काराच्या प्रकरणानंतर त्यांनी हे उद्गार काढले.
पीडितेला गर्भपातास कोर्टाची संमती
- चेन्नई : बलात्कारामुळे गरोदर राहिलेल्या १४ वर्षांच्या मुलीला गर्भपाताला मद्रास उच्च न्यायालयाने शुक्रवारी परवानगी दिली. तिच्यावर पाच महिन्यांपूर्वी बलात्कार झाला होता.
- त्या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर बाल कल्याण समितीने त्यात लक्ष घातले होते. मुलीच्या पोटातील गर्भ १५ आठवड्यांचा आहे. गर्भपाताची सूचना बाल कल्याण समितीनेच केली होती.
- मात्र, आई व मुलगी तसे करण्यास घाबरत होते. त्यांची समजूत घातल्यानंतर मुलगी तयार झाली आणि डॉक्टरांच्या अहवालानंतर न्यायालयाने गर्भपातास संमती दिली.