Coronavirus: पुण्याहून दानापूरला ट्रेन पोहचली, १७ जण पॉझिटिव्ह निघाले; अर्धा तास डब्ब्यातच प्रवासी अडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 11:05 AM2021-04-11T11:05:52+5:302021-04-11T11:07:00+5:30
१५ मेडिकल टीमच्या माध्यमातून प्रवाशांची तपासणी होणार होती. रेल्वे आधी पोहचल्याने प्रवाशांना ट्रेनमध्ये बसवण्यात आलं होतं
पटना – रात्री उशीरा पुण्याहून दानापूर येथे आलेल्या ट्रेनमध्ये १७ कोरोना पॉझिटिव्ह प्रवासी आढळले. कोरोना काळात धावणारी ही विशेष ट्रेन रात्री ११ च्या सुमारास दानापूर रेल्वे स्टेशनला पोहचली. मात्र यावेळी प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड झाला. दानापूर जंक्शनवर पुण्याहून ही ट्रेन तिथे पोहचली होती. यात ८०० प्रवाशी प्रवास करत होते. निर्धारित वेळेपेक्षा ४८ मिनिटं लवकरच ही ट्रेन दानापूर स्टेशनवर पोहचली होती.
त्यामुळे अर्धा तास प्रवाशांना ट्रेनमध्येच बंद राहावं लागलं. अर्ध्या तासानंतर जेव्हा मेडिकल टीम तपासासाठी रेल्वे स्टेशनवर पोहचली. १५ मेडिकल टीमच्या माध्यमातून प्रवाशांची तपासणी होणार होती. रेल्वे आधी पोहचल्याने प्रवाशांना ट्रेनमध्ये बसवण्यात आलं होतं. त्यानंतर प्रवाशांना रांगेत उतरून कोविड १९ चाचणी करावी लागली. यात ५२४ प्रवाशांच्या तपासणीवेळी १७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. महाराष्ट्रात कधीही लॉकडाऊन लागू शकतो त्यामुळे कामधंदे ठप्प झाले. त्यामुळे हे प्रवाशी पुन्हा बिहारला परतले होते.
मजूरांना त्यांच्या मूळगावी परतण्याशिवाय कोणता पर्याय शिल्लक नव्हता. म्हणून या प्रवाशांनी पुण्याहून दानापूर असा रेल्वे प्रवास केला. बिहारमध्ये शनिवारी कोरोनाचा कहर पाहायला मिळाला. गेल्या २४ तासांत ३ हजार ४६९ नवीन कोरोना संक्रमित रुग्ण आढळले. या वर्षी एकाच दिवसात सर्वाधिक रुग्णसंख्या समोर आली. राज्यात कोरोना संक्रमितांची संख्या ११ हजार ९९८ इतकी झाली आहे. पटना येथे सर्वाधित १ हजार ४३१ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत.
बिहारमध्ये गया ३१०, औरंगाबाद ९३, बेगुसराय ८०, भागलपूर ९७, भोजपूर ७४, जहानाबाद ७७, लखीसराय ७०, मुजफ्फरपूर १८३ तर पूर्णिया ८७ असे कोरोनाबाधित आढळले. मागील २४ तासांत ९५ हजार ११२ लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. ज्यात ३ हजार ४६९ कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढून ११ हजार ९९८ इतकी झाली आहे. राज्यात २ लाख ६५ हजार ८७० कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत.