हृदयद्रावक! 17 महिन्यांच्या शिवांशीला दुर्मिळ आजार; जीव वाचवण्यासाठी हवं 17 कोटींचं इंजेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 05:02 PM2023-11-01T17:02:38+5:302023-11-01T17:03:52+5:30
17 महिन्यांची मुलगी दुर्मिळ आजाराने त्रस्त आहे, जीव वाचवण्यासाठी तिला 17 कोटींचं इंजेक्शन हवं आहे. जे अमेरिकेतून मागवलं जातं.
गुरुग्राममध्ये 17 महिन्यांची मुलगी दुर्मिळ आजाराने त्रस्त आहे, जीव वाचवण्यासाठी तिला 17 कोटींचं इंजेक्शन हवं आहे. जे अमेरिकेतून मागवलं जातं. हे इंजेक्शन फक्त 2 वर्षांच्या मुलापर्यंतच दिलं जाऊ शकतं. शिवांशी मिश्राच्या आई-वडिलांना या आजाराची माहिती मिळाल्यावर त्यांनी कॅनविन आयोग धाम गाठलं. कारण कॅनविनने याआधीही याच आजाराने ग्रस्त असलेल्या रेयांश मदान आणि कनव जांगरा या दोन मुलांवर उपचारासाठी लोकांना आवाहन करून क्राउड फंड गोळा केला होता.
कॅनविन फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. डीपी गोयल यांच्या मते, स्पाइनल मस्कुलर एट्रोफी (SMA) नावाचा हा आजार इतका जीवघेणा आहे की त्याचं एकमेव इंजेक्शन फक्त अमेरिकेतच बनवलं जातं. डीपी गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे पालक सोमवारी कॅनविन फाऊंडेशनमध्ये आले आणि त्यांनी 17 कोटी रुपये जमा करण्यासाठी मदतीची विनंती केली.
डीपी गोयल यांनी याआधीही दोन मुलांच्या उपचारासाठी लोकांना आवाहन करून निधी गोळा केला होता आणि यावेळीही क्राऊड फंडिंगसाठी विनंती करणार असल्याचं आश्वासन दिलं. गोयल यांच्या मते, हे इंजेक्शन फक्त 2 वर्षांपर्यंत देता येतं. म्हणजेच, लवकरात लवकर दिलं जाईल तितका फायदा जास्त आहे. मुलगी सध्या 17 महिन्यांची आहे, अजून 7 महिने बाकी आहेत.
डॉक्टरांनी सांगितले की, हा आजार जगातील 10 हजार मुलांपैकी एकाला होतो. कॅनविन आता मुलीला मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. मुलीच्या मदतीसाठी, एक बँक खातं उघडण्यात आलं आहे, ज्यामध्ये कोणतीही व्यक्ती 1 रुपयांपासून रक्कम देऊ शकते. मुलीचं कुटुंब गुरुग्रामच्या सेक्टर 43 मध्ये राहतं आणि मुलीचे वडील एका खासगी आयटी कंपनीत मुख्य सल्लागार आहेत. वडील आकाश मिश्रा आणि आई आरती शुक्ला यांनी शिवांशीचा जीव वाचवणं तुमच्या हातात आहे, असे हृदयस्पर्शी आवाहन केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.