गुजरातमध्ये अतिवृष्टीमुळे २४ तासांत १७ जणांचा मृत्यू, अहमदाबाद-सुरत महामार्ग बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 10:34 AM2022-07-15T10:34:29+5:302022-07-15T10:34:54+5:30
३१ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले.
अहमदाबाद : देशभरात अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. महाराष्ट्राशिवाय गुजरात, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तसेच केरळ या राज्यांना पावसाचा तडाखा असला आहे. त्यातही गुजरातमध्येपूरस्थिती अतिशय गंभीर असून, गेल्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाने १७ जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबाद-सुरत महामार्ग बंद करण्यात आला असून, त्यामुळे मुंबई व नागपूरला जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. पूर आणि भूस्खलनाच्या विविध घटनांमध्ये जून महिन्यापासून देशभरात २२१ जणांचा मृत्यू झाला आहे.
गुजरातच्या पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. आतार्यंत ३१ हजार जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. एकट्या गुजरातमध्येच गेल्या चार दिवसांमध्ये ८३ जणांचा अतिवृष्टीमुळे वलसाड, नवसारी, डांग, जूनागड, साेमनाथ हे या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. नवसारीमध्ये वांसडा तालुक्यात गेल्या २४ तासांमध्ये ४०० मिलिमीटर पाऊस झाला. या ठिकाणी अनेक भागात गुडघाभर पाणी आहे. पुरामुळे मुंबई-अहमदाबाद आणि नागपूर-सूरत महामार्ग बंद करण्यात आला आहे. वलसाडमध्ये कापरादा आणि धर्मापूर तालुक्यात ३५० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाची पथकांकडून बचावकार्य सुरू आहे.
अहमदाबादजवळ तीन महिलांचा मृत्यू
अहमदाबाद शहराजवळ ओगनाज भागात सुरक्षा भिंत कोसळून दोन महिला मजूर व एका १६ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला, तर पाच महिला जखमी झाल्या आहेत. या महिला तात्पुरत्या निवाऱ्यामध्ये राहत होत्या.
मध्य प्रदेशमध्ये नर्मदा धोक्याच्या पातळीवर
मध्य प्रदेशमध्ये आतापर्यंत ६६ जणांचा अतिवृष्टीमुळे मृत्यू झाला आहे. राजधानी भोपाळमध्ये २२ इंच पावसाची नोंद झाली आहे. सर्वसामान्य प्रमाणापेक्षात ११ इंच जास्त पाउस या ठिकाणी झाला आहे. इंदूरमध्येही गेल्या २४ तासांत ३ इंच पाउस पडला आहे.
राजस्थानमध्ये ऑरेंज अलर्ट जारी
राजस्थानमध्ये बांसवाडा, झालावाड, भीलवाडा, अलवर इत्यादी जिल्ह्यांमध्ये ४ ते ५ इंच पावसाची नोंद झाली. सिरोही आणि उदयपूर या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय कर्नाटकमध्ये ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तेलंगणामध्ये शाळा, महाविद्यालयांना १६ जुलैपर्यंत सुट्टी
तेलंगणामध्येही मुसळधार पावसामुळे राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांची सुट्टी १६ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. उत्तराखंडमध्ये टिहरी जिल्ह्यात गंगा नदीमध्ये ४ जण वाहून गेले.