विकासात भारत सुस्साट, नागपूरही सुपरफास्ट... जगातील वेगाने विकसित होणाऱ्या टॉप-२० पैकी १७ शहरं भारतात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 03:13 PM2018-12-07T15:13:05+5:302018-12-07T15:13:57+5:30
येत्या काळामध्ये जगातील वेगाने विकसित होत असलेल्या शहरांमध्ये भारतातील शहराचे वर्चस्व दिसून येणार आहे.
नवी दिल्ली - येत्या काळामध्ये जगातील वेगाने विकसित होत असलेल्या शहरांमध्ये भारतातील शहराचे वर्चस्व दिसून येणार आहे. एका ग्लोबल इकॉनमिक रिसर्चमध्ये देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे जीडीपीच्या दृष्टीने जगातील वेगाने विकसित होत असेल्या 20 शहरांपैकी 17 शहरे भारतातील असणार आहेत.
ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स नावाच्या एका संशोधन संस्थेने हे सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार भविष्यातील जीडीपी वाढीची तुलना केल्यास 2019 ते 2035 यादरम्यान, जगातील 20 वेगाने विकसित होत असलेल्या शहरांमध्ये भारतातील 17 शहरांचा समावेश असेल. यामध्ये बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नईची कामगिरी चांगली असेल.
या काळात वेगाने विकसित होणाऱ्या अव्वल दहा शहरांमध्ये सूरतने पहिले स्थान पटकावले आहे. त्यानंतर आग्रा आणि बंगळुरूचा क्रमांक लागला आहे. हैदराबाद या क्रमवारीत चौथ्या तर नागपूर पाचव्या स्थानी आहे. त्यानंतर तिरुपूर, राजकोट, तिरुचिरापल्ली, चेन्नई आणि विजयवाडा यांचा क्रमांक लागला आहे.
हिऱ्यांवरील प्रक्रिया आणि विक्रीचे केंद्र असल्याने तसेच आयटी सेक्टर विकसित झाल्याने सूरतला या क्रमवारीत पहिले स्थान मिळाले आहे. बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नई ही शहरे तंत्रज्ञान केंद्र आणि पतपुरवठा करणाऱ्या संस्थांसाठी ओळखली जातात. भारताबाहेर नोम पेन्ह हे 2019 ते 2035 दरम्यान जगातील सगळ्यात वेगाने विकसित होणारे शहर असेल. तर आफ्रिकेमधील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये दार अस सलाम अव्वलस्थानी असेल.
लोकसंख्येचा विचार केल्यास 2035 मध्ये अव्वल दहा शहरांमध्ये मुंबई पहिल्या स्थानी असेल. ऑक्सफर्ड ग्लोबल इकॉनमिक रिसर्चचे प्रमुख रिचर्ड हॉल्ट यांनी सांगितले की 2035 पर्यंत भारतीय शहरांचा एकत्रित जीडीपी हा चीन, उत्तर अमेरिका आणि युरोपमधील शहरांच्या तुलनेत कमीच असेल. मात्र असेल असले तरी प्रत्येक बाबतीत भारतीय शहरे आगेकूच करणार आहे.