वादळाचे यूपीत १७ बळी; असंख्य घरे उद्ध्वस्त, झाडे जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 01:24 AM2018-06-03T01:24:24+5:302018-06-03T01:24:24+5:30
धुळीचे वादळ व जोरदार पावसाचा तडाखा याने उत्तर प्रदेशात शुक्रवारी संध्याकाळपासून आतापर्यंत १७ जणांचा बळी घेतला असून, ११ जण जखमी झाले.
लखनौ : धुळीचे वादळ व जोरदार पावसाचा तडाखा याने उत्तर प्रदेशात शुक्रवारी संध्याकाळपासून आतापर्यंत १७ जणांचा बळी घेतला असून, ११ जण जखमी झाले. या वादळामुळे अनेक झाडे कोलमडली, विजेचे खांब कोसळले आणि अनेक ठिकाणी विजाही कोसळल्या. काही ठिकाणी वाऱ्याने घरेही उद्ध्वस्त झाली आहेत. उत्तराखंडातही पाऊ स कोसळत असून, येत्या ४८ तासांत ढगफुटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
घरे कोसळल्याने आणि झाडे अंगावर पडल्यानेच हे मृत्यू झाले असल्याचे राज्याच्या प्रशासनातर्फे सांगण्यात आले. यापैकी ९ मृत्यू मोरादाबाद जिल्ह्यातील आहेत. संभळ जिल्ह्यात तीन जण मृत्युमुखी पडले असून, मेरळ व मुझफ्फरनगरमध्ये प्रत्येकी दोन जण मरण पावले आणि अमरोहा जिल्ह्यात एक जण अंगावर झाड कोसळून मरण पावला. धुळीच्या वादळाचा त्रास होऊ नये, यासाठी अमरोहा जिल्ह्यातील तरुण झाडाखाली उभा होता. ते झाडच नेमके त्याच्या अंगावर कोसळले. जखमींवर मोफत उपचार करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांना दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना भरपाईही दिली जाणार आहे. ज्यांनी घरे उद्ध्वस्त झाली, त्याची पाहणी करून त्यांना मदत करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. (वृत्तसंस्था)
उत्तराखंडात ढगफुटी
उत्तराखंडमधील टिहरी, उत्तरकाशी, पौडी व नैनिताल या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी संध्याकाळीही ढगफुटी झाली. त्यानंतर डेहराडूनमध्ये मुसळधार वृष्टी झाली. या चारही जिल्ह्यातील नद्या भरून वाहू लागल्या आहेत आणि कित्येक घरांमध्ये पाणी शिरले आहे. अनेक रस्तेही पावसाने वाहून गेले असून, काही गावांचा त्यामुळे संपर्कच तुटला आहे. बद्रीनाथ हायवेही काल संध्याकाळपासून बंद करण्यात आला. राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाºयांना सतर्कतेचे आदेश दिले असून, एसडीआरएफ व एनडीआरएफच्या तुकड्या या चार जिल्ह्यांत रवाना करण्यात आल्या आहेत. डेहरादून, उधमसिंहनगर, हरिद्वार व पौडी गढवालमध्ये ताशी ७0 ते ८0 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि डोगराळ भागात अतिवृष्टी होऊ शकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
दिल्लीलाही फटका : दिल्लीमध्येही कालपासून वेगाने वारे वाहत असून, तिथे आजही अनेक भागांत धुळीचे वादळ झाले. त्यामुळे काही भागांतील वीजच बेपत्ता झाली होती. दिल्लीत एक जण या वादळात मरण पावला.