17 वर्षाच्या मुलीने 64 वेळा तोडले वाहतुकीचे नियम
By admin | Published: February 6, 2017 01:17 PM2017-02-06T13:17:08+5:302017-02-06T13:17:08+5:30
म्हैसूरमधील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने पोलिसांच्या नाकी नऊ आणले असून आतापर्यंत तब्बल 64 वेळा वाहतुकीचे नियम तोडले आहेत
Next
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 6 - म्हैसूरमधील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने पोलिसांच्या नाकी नऊ आणले असून आतापर्यंत तब्बल 64 वेळा वाहतुकीचे नियम तोडले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या वाहतुकीच्या नियमांच्या उल्लंघनासाठी या मुलीच्या पालकांना एकूण 9 हजार 100 रुपयांचा दंड भरावा लागला आहे.
ही अल्पवयीन मुलगी एका कॉलेजमध्ये शिकत असून प्रवासाकरिता पालकांनी तिला स्कूटर खरेदी करुन दिली होती. म्हैसूरमधील केआर मोहल्ला परिसरात राहणा-या या मुलीने पोलिसांना चकवा देण्यासाठी गाडीची नंबर प्लेटही काढून टाकली होती.
गुरुवारी पोलीस कॉन्स्टेबल वसंत कुमार यांना एका स्कूटवर तीन जण प्रवास करत असल्याची माहिती मिळाली होती. मेट्रोपोल सर्कलजवळ त्यांनी गाडी थांबवली. विना नंबर प्लेट गाडी चालवण्याबद्दल विचारणा केली असता मुलीने डिकीमध्ये ठेवलेली नंबर प्लेट काढून दाखवली. वसंत कुमार यांनी गाडीची माहिती मिळवली असता आतापर्यंत 64 वेळा या गाडीने वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी गाडी जप्त करत दंड भरण्यासाठी पालकांना घेऊन पोलीस ठाण्यात येण्यास सांगितलं. देवराजा वाहतूक पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदेश कुमार यांनी मुलीवर नजर न ठेवल्याबद्दल पालकांना चागलंच झापलं. मुलीच्या पालकांनी यावेळी 9 हजार 100 रुपयांचा दंड भरला. तसंच मुलगी सज्ञान होईपर्यंत गाडी देणार नाही असं आश्वासनही दिलं.