बळीराजा संकटात, नवी मुंबईत १७० झाडांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 03:31 AM2020-08-07T03:31:51+5:302020-08-07T03:32:55+5:30
वडवली, शिस्ते येथील यशवंती खार शेतजमीन पूर्णपणे पाण्याखाली गेली होती. दिवेआगर, बोर्लीपंचतन शहरातील रस्ते पाण्याखाली व काही घरांचे पत्रे उडून गेल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले होते.
दिघी : अतिवृष्टीमुळे श्रीवर्धन तालुक्यासह बोर्लीपंचतन परिसरात गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या वादळी पावसाने भात रोपे वाहून गेली आहेत. निसर्ग चक्रीवादळातून सावरत असताना तालुक्यातील अनेक गाव-पाड्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिल्याने बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे. तर अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले आहेत.
वडवली, शिस्ते येथील यशवंती खार शेतजमीन पूर्णपणे पाण्याखाली गेली होती. दिवेआगर, बोर्लीपंचतन शहरातील रस्ते पाण्याखाली व काही घरांचे पत्रे उडून गेल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. पावसामुळे वीज दोन दिवस खंडित झाली असून सध्या तालुका अंधारात आहे.
निसर्ग चक्रीवादळाची पुनरावृत्ती?
बोर्लीपंचतन परिसरात अतिवृष्टीने सर्वत्र पाणीच पाणी केले होते. मुसळधार पडत असलेल्या पावसासोबत सोसाट्याचा वाऱ्याची तीव्रता वाढत होती. येथील नागरिक निसर्ग चक्रीवादळाने उद्भवलेल्या संकटातून सावरत असतानाच सध्याच्या अतिवृष्टीमुळे पुन्हा भयभीत झाले आहेत. श्रीवर्धन - बोर्लीपंचतन व दिघी - बोर्लीपंचतन मार्ग पाण्याखाली आल्याने दिघी सागरी पोलीस ठाण्याकडून या आपत्तीत धोका टाळण्यासाठी या मार्गावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या मार्गावरील पाणी वाढत असल्याने अनेक प्रवाशांना थांबविण्यासाठी पोलीस तैनात होते.
दोन दिवस मार्ग बंद
1सलग चार दिवस पावसाने श्रीवर्धन परिसरात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणीच पाणी झाले. मंगळवार, बुधवार असे सलग दोन दिवस काही तास दोन प्रमुख मार्ग पाण्याखाली आले होते. श्रीवर्धन - बोर्लीपंचतन व दिघी - बोर्लीपंचतन अशा दोन विभागांचे संपर्क तुटले होते. पावसामुळे मच्छीमारी व्यवसायावर विपरीत परिणाम झाला असल्याची भावना तालुक्यातील मच्छीमारांनी व्यक्त केली.
४० हून अधिक गावांचा वीजपुरवठा खंडित
2निसर्ग चक्रीवादळामुळे महावितरणचे मोठे नुकसान झालेली वीज जोडणी दुरुस्ती करण्यात आली. मात्र, या वादळी पावसाने बोर्लीपंचतन, दिघी, दांडगुरी परिसरातील ४० हून अधिक गावांचा दोन दिवसांनंतरही अद्याप वीजपुरवठा खंडित आहे.
नवी मुंबईत १७० झाडांचे नुकसान
नवी मुंबई : बुधवारी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सुमारे १७० झाडांचे आणि ९ वाहनांचे नुकसान झाले आहे. शहरात चोवीस तासांत सुमारे १८४.८४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अनेक सोसायट्यांच्या छतावरील पत्रेदेखील उडून गेल आहेत.
बुधवार, ५ आॅगस्ट रोजी वाºयासह पाऊस सुरू झाला. या पावसात शहरातील १७० झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. तर सुमारे ९ वाहनांचेदेखील नुकसान झाले आहे. वाºयामुळे अनेक सोसायट्यांच्या छतावरील पत्र्याचे शेडदेखील उडून गेले आहेत. रस्त्यावर झाडे कोसळल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता ठिकठिकाणी पडलेली झाडे आणि मोठ्या फांद्या हटवून वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत. त्यानुसार अग्निशमन विभाग तसेच ८ विभाग कार्यालयांतील मदत केंद्रे आणि उद्यान विभाग यांनी सदरची पडलेली झाडे व झाडाच्या मोठ्या फांद्या हटविण्याचे काम सुरू केले आहे.