'आयुष्यमान भारत' योजनेत मोठा घोटाळा उघडकीस; गुजरातमध्ये एकाच कुटुबांला दिले १७०० आरोग्य कार्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 02:59 PM2020-01-03T14:59:47+5:302020-01-03T15:07:28+5:30
आयुष्यमान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजनेत बनावट आरोग्य कार्ड वाटपाच्या आरोपाखाली राजकोटमध्ये ६ जणांना अटक करण्यात आली आहे.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी 'आयुष्यमान भारत' योजनेत मोठ्या प्रमाणात घोटाळा असल्याचं समोर येत आहे. या योजनेतंर्गत २ लाखांहून अधिक बनावट कार्ड बनविण्यात आल्याचं उघड झालं आहे. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार गुजरातमध्ये एकाच कुटुंबात तब्बल १७०० आयुष्यमान भारत कार्ड आढळून आले आहेत. तर छत्तीसगडमध्ये एका कुटुंबातील ५७ जणांना या योजनेतून डोळ्यांची सर्जरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात सखोल चौकशी केल्यास मोठ्या प्रमाणात घोटाळा समोर येण्याची शक्यता आहे. सध्या हे प्रकरण पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे पोहचले आहे.
बनावट कार्ड बनविण्याचे सर्वाधिक प्रकार उत्तर प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, महाराष्ट्र, हरियाणा, उत्तराखंड आणि झारखंडमधून समोर आलेत. सध्या देशभरात २ लाखांपेक्षा अधिक आयुष्यमान भारत योजनेची बनावट कार्ड असल्याचं उघड झालं आहे. आयुष्यमान भारत योजनेतंर्गत गरिब रुग्णांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिला जातो. ज्याचा खर्च सरकारकडून केला जातो.
आयुष्यमान भारत योजनेतील बनावट कार्डाचे प्रकार समोर आलेत. यात गुजरातमधील एका हॉस्पिटलमध्ये आरोग्य मित्राने एकाच कुटुंबाच्या नावावर १७०० बनावट कार्ड बनविले आहेत. छत्तीसगडच्या एएसजी रुग्णालयात एका कुटुंबाच्या नावावर १०९ बनावट कार्ड असल्याचं उघड झालं. यामधील ५७ जणांनी उपचाराचा फायदाही करुन घेतला आहे. पंजाबमध्ये दोन कुटुबांच्या नावावर २०० कार्ड बनविण्यात आलेत. तर मध्यप्रदेशात एका कुटुबांच्या नावावर ३२२ बनावट कार्ड छापण्यात आले आहेत.
आयुष्यमान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजनेत बनावट आरोग्य कार्ड वाटपाच्या आरोपाखाली राजकोटमध्ये ६ जणांना अटक करण्यात आली आहे. एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, राजकोटच्या एका सरकारी शाळेत शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यात अनेकांना बनावट कार्ड वाटप करण्यात आलं, प्रत्येक व्यक्तीकडून ७०० रुपये शुल्क घेण्यात आलं. मिळालेल्या माहितीच्या आधारे राजकोटच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष जैमीन ठकर यांनी घटनास्थळावर छापा टाकत पोलिसांना माहिती दिली. केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेची सुरुवात सप्टेंबर २०१८ मध्ये करण्यात आली होती. या योजनेतून आजतागायत ७० लाख लोकांनी उपचार घेतले आहेत. त्यासाठी सरकारने ४ हजार ५९२ कोटी रुपये खर्च केले आहेत.