देशात पहिल्यांदाच १७५ रुपयांचे नाणे!, लवकरच जारी होणार विशेष नाणं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 06:45 AM2022-07-13T06:45:41+5:302022-07-13T06:46:37+5:30
रुरकीतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेला १७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सरकार जारी करणार नाणं.
नवी दिल्ली : हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल की, देशात कधी १७५ रुपयांचे नाणे जारी होऊ शकते काय? होय, हे शंभर टक्के खरे आहे की, देशात लवकरच १७५ रुपयांचे स्मारक नाणे जारी होणार आहे. उत्तराखंडमधील रुरकी येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या स्थापनेला १७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त केंद्र सरकार १७५ रुपयांचे विशेष नाणे जारी करणार आहे. नाण्यांचा अध्ययन करणारे सुधीर लुनावत यांनी याबाबत माहिती दिली.
या नाण्याची निर्मिती भारत सरकारच्या मुंबई टांकसाळमध्ये होणार आहे; तर, नाण्याची अंदाजे किंमत ४००० रुपयांच्या आसपास असेल. त्यांनी सांगितले की, यापूर्वीही केंद्र सरकारने वेगवेगळ्या निमित्ताने ६० रुपये, ७५ रुपये, १२५ रुपये, १५० रुपये, २५० रुपये, ३५० रुपये, ४००, ५००, ५५० आणि हजार रुपयांचे स्मारक नाणे जारी केले होते.
नाण्याच्या दुसऱ्या बाजूला अशोक स्तंभाच्या खालील बाजूला सत्यमेव जयते व ₹ च्या चिन्हासोबत १७५ लिहिले असेल. उजवीकडे आणि डावीकडे हिंदी व इंग्रजीत रुपये आणि भारत लिहिलेले असेल.
३५ ग्रॅम वजन
५० टक्के चांदी
४० टक्के तांबे
५ टक्के निकेल
५ टक्के जस्त
४४ मिमी गोलाकार