देशात १.७९ लाख, जगात १८ लाख नवे रुग्ण; १४६ जणांचा मृत्यू; ७ लाख २३ हजार सक्रिय रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 08:19 AM2022-01-11T08:19:54+5:302022-01-11T08:20:05+5:30
७ लाख २३ हजार ६१९ सक्रिय रुग्ण असून त्यांचे प्रमाण एकूण रुग्णांच्या तुलनेत २.०३ टक्के आहे.
नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत असून रुग्णांच्या आकडेवारीत दिवसागणिक वाढच होत चालली आहे. गेल्या चोवीस तासांत देशामध्ये कोरोनाचे १ लाख ७९ हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण आढळले व १४६ जणांचा मृत्यू झाला. सक्रिय रुग्णांची संख्या ७ लाख २३ हजारांवर पोहोचली असून तो मागील २०४ दिवसांतील सर्वाधिक आकडा आहे. ओमायक्रॉन बाधितांचे प्रमाण ४०३३ झाले असून या नव्या विषाणूचा संसर्ग २७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरला आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशात ३ कोटी ५७ लाख ७ हजार ७२७ कोरोना रुग्णांपैकी ३ कोटी ४५ लाख १७२ जण बरे झाले. एकूण रुग्णांपैकी बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९६.६२ टक्के आहे. गेल्या चोवीस तासात १ लाख ७९ हजार ७२३ नवे रुग्ण सापडले. हे मागील २२७ दिवसांतील सर्वाधिक प्रमाण आहे. त्याआधी २७ मे २०२१ रोजी १ लाख ८६ हजार ३६४ नवे रुग्ण सापडले होते.
७ लाख २३ हजार ६१९ सक्रिय रुग्ण असून त्यांचे प्रमाण एकूण रुग्णांच्या तुलनेत २.०३ टक्के आहे. रविवारी सक्रिय रुग्णांमध्ये १ लाख ३३ हजार ८ जणांची भर पडली. ओमायक्रॉनच्या ४०३३ रुग्णांपैकी १५५२ जण बरे झाले. महाराष्ट्रामध्ये या विषाणूच्या बाधितांची संख्या सर्वाधिक असून त्यानंतर राजस्थान, दिल्ली, कर्नाटक, केरळ, गुजरात यांचा क्रमांक लागतो.
पहिल्या दिवशी ९.५ लाख लोकांना बूस्टर
कोरोनाचे वाढते रुग्ण आणि वयस्करांना असलेल्या त्याच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून लसीची तिसरी मात्रा (बूस्टर डोस किंवा पूरक मात्रा) देण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी देशात ९.५ लाख लोकांनी ही मात्रा घेतली. सर्वात जास्त संख्या गुजरातमध्ये होती तर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हे प्रमाण कमी होते. आरोग्य मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार, सायंकाळी ६ वाजेपर्यंत देशात गुजरातेत १.५२ लाख, उत्तर प्रदेशमध्ये ५७,२५२ आणि महाराष्ट्रात ४८,६०५ जणांनी ही मात्रा घेतली.