काश्मिरात घुसले १८ अतिरेकी
By admin | Published: May 16, 2016 03:53 AM2016-05-16T03:53:11+5:302016-05-16T03:53:11+5:30
या वर्षी एप्रिलमध्ये काश्मीर खोऱ्यात १८ अतिप्रशिक्षित अतिरेकी घुसले
नवी दिल्ली/ श्रीनगर : या वर्षी एप्रिलमध्ये काश्मीर खोऱ्यात १८ अतिप्रशिक्षित अतिरेकी घुसले असून त्यापैकी तिघांना सुरक्षा संस्थांनी कंठस्नान घातले आहे. पाकिस्तानकडून प्रशिक्षण मिळाल्यानंतर नियंत्रण रेषा ओलांडून भारतात आलेल्या जैश-ए -मोहम्मद या संघटनेच्या अब्दुल रेहमान या अतिरेक्याकडे तर आधारकार्डही आढळून आल्यामुळे सुरक्षा संस्थांचे धाबे दणाणले आहे. काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात पकडण्यात आलेला रेहमान हा जानेवारीमध्येच पाकव्याप्त काश्मिरातून आला होता. त्याने आत्मघाती हल्ल्यांसाठी स्थानिक युवकांची भरती चालविली होती.
अलीकडेच विविध सुरक्षा संस्थांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली असता उत्तर काश्मिरातील कुपवाडा भागात १८ अतिरेकी घुसल्याचा दावा करण्यात आला होता, मात्र तांत्रिक गुप्तचर, संरक्षण गुप्तचर आणि अन्य केंद्रीय सुरक्षा संस्थांच्या दाव्यांमध्ये मतभिन्नता आढळून आली. १२ एप्रिल रोजी दर्दपोरा या गावी नियंत्रण रेषेवरून १२ अतिरेक्यांच्या पहिल्या तुकडीने तर सहा अतिरेक्यांनी १७ एप्रिल रोजी लोलाब भागातून घुसखोरी केल्याची माहिती मिळाली आहे. लोलाबच्या पुत्शाई भागात तीन अतिरेकी गोळीबारात मारले गेले. रेडिओ लहरींकडून मिळालेले संकेत तसेच कुपवाडा आणि लोलाबमधील घुसखोरांच्या पायांचे वेगवेगळे ठसे अतिरेक्यांचे दोन गट असल्याकडे अंगुलीनिर्देश करतात. जम्मूतून होणारे घुसखोरीचे तीन प्रयत्न निष्फळ ठरविण्यात आल्याबद्दल सर्व सुरक्षा संस्थांमध्ये एकवाक्यता होती. घुसखोरी करणाऱ्या अतिरेक्यांनी बांदापोराच्या पर्वतीय भागातून मध्य आणि दक्षिण काश्मीरमध्ये प्रवेश केला असावा, असे सूत्रांनी म्हटले.
दोन महिन्यांपासून रेहमानच्या मागावर...
लष्कराने जम्मू-काश्मीर पोलिसांच्या मदतीने संयुक्त मोहीम राबवत रेहमानला जिवंत पकडल्यामुळे ते सुरक्षा संस्थांचे मोठे यश ठरले आहे. त्याच्या चौकशीतून महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकते, असे बारामुल्ला विभागाचे जनरल आॅफिसर कमाडिंग( जीओसी) मेजर जनरल जे.एस. नैन यांनी सांगितले.
गेल्या दोन महिन्यांपासून सुरक्षा दल त्याच्या मागावर होते. अखेर जुन्या बारामुल्लाच्या जंगल भागात शुक्रवारी तो जाळ्यात अडकला. रेहमानने बारामुल्लाला सातवेळा भेटी दिल्या आहेत. त्याने बारामुल्ला, सोपोर आणि कुंपवाडामधील युवकांची भरती करण्याचा प्रयत्न चालविला होता.
>आधारकार्डवर ‘शाबीर अहमद खान’
रेहमानकडे आढळून आलेल्या आधारकार्डवर शाबीर अहमद खान याचे नाव असून ते खरे निघाल्यास ती सुरक्षा संस्थांसाठी चिंतेची बाब ठरेल. पाच अतिरेक्यांना काश्मीरखोऱ्यात घुसण्यापूर्वी असे आधारकार्ड देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
आधारकार्ड बनावट असेल तर ती तेवढी गंभीर बाब नसेल
कारण कुणीही बनावट दस्तऐवज बनवू शकतात, असेही
नैन यांनी म्हटले. दक्षिण काश्मिरात अतिरेकी सक्रिय असून तशीच परिस्थिती उत्तर काश्मिरात निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
रेहमानने बालाकोट
येथील शिबिरात पाकिस्तानी गुप्तचर
संघटना आयएसआयच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षिण घेतले होते. जानेवारीमध्ये त्याने चार सहकाऱ्यांसह काश्मीर खोऱ्यात घुसखोरी केली होती. दोन महिने या सर्वांनी जंगलात वास्तव्य केल्यानंतर रेहमानकडे बारामुल्लाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मोठे फिदायीन (आत्मघाती) हल्ले सोपविण्यासाठी या चौघांचा गट तयार करण्यात आला होता. काश्मिरातील युवकांना आत्मघाती हल्ल्यात सहभागी करवून घेण्याचे मिशन नवे असून ही गंभीर चिंतेची बाब असल्याचे मेजर जन. नैन यांनी नमूद केले.