राम मंदिर उभारणीवर १८०० कोटींचा खर्च येणार; डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 06:10 AM2022-09-13T06:10:21+5:302022-09-13T06:10:48+5:30
मंदिराचे बांधकाम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून, जानेवारी २०२४ च्या मकर संक्रांती पर्वावर भगवान श्रीरामांच्या मूर्तीची गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा होईल.
अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी अंदाजे १८०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे, अशी माहिती मंदिराच्या बांधकामाची जबाबदारी असलेल्या विश्वस्त संस्थेच्या (ट्रस्ट) अधिकाऱ्यांनी रविवारी येथे दिली.
राम मंदिर उभारण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून स्थापन झालेल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने येथील एका मॅरेथॉन बैठकीत आपले नियम व नियमावलीला मंजुरी दिली. फैजाबाद सर्किट हाऊसमध्ये ही बैठक झाली. बैठकीत मंदिर संकुलात प्रमुख हिंदू धर्मगुरूंच्या पुतळ्यांसाठी तसेच रामायण काळातील प्रमुख चरित्रांच्या मूर्तींसाठी जागा ठेवण्याचा निर्णय ट्रस्टच्या सदस्यांनी एकमताने घेतला. ट्रस्टने केवळ राम मंदिराच्या उभारणीवर १ हजार ८०० कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचा अंदाज बांधला आहे. मंदिराचे बांधकाम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून, जानेवारी २०२४ च्या मकर संक्रांती पर्वावर भगवान श्रीरामांच्या मूर्तीची गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा होईल.