गेल्या पाच वर्षांत 182 आमदार भाजपमध्ये!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 01:56 AM2021-03-12T01:56:20+5:302021-03-12T01:57:14+5:30
४३३ खासदार-आमदारांचे पक्षांतर
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राजकारणात पक्षांतर नवे नाही. त्यातच निवडणुका जवळ येताच राजकीय नेते पक्ष बदलताना दिसतात. एका अहवालानुसार, गेल्या पाच वर्षांमध्ये निवडणुकीच्या काळात ४३३ खासदार आणि आमदारांनी पक्षांतर करून पुन्हा निवडणूक लढविली असून, त्यात सर्वाधिक १७० आमदार काँग्रेसचे आहेत. तर भारतीय जनता पार्टीच्या केवळ १८ आमदारांनी पक्षाला रामराम केला आहे.
‘असाेसिएशन ऑफ डेमाेक्रॅटिक रिफाॅर्म्स’ (एडीआर) या समूहाने हा अहवाल तयार केला आहे. त्यात ४३३ खासदार आणि आमदारांच्या शपथपत्रांचा अभ्यास करण्यात आला आहे. या अहवालानुसार २०१६ ते २०२० या कालावधीत झालेल्या निवडणुकीदरम्यान ४०५ आमदारांनी पक्षांतर केले. त्यापैकी सर्वाधिक १८२ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढविली. त्यानंतर ३८ जणांनी काँग्रेस तर २५ जणांनी तेलंगणा राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला. २०१९ च्या लाेकसभा निवडणुकीदरम्यान भाजपच्या पाच खासदारांनी पक्षांतर केले. तर २०१६ ते २०२० या कालावधीत काँग्रेसच्या सहा राज्यसभा सदस्यांनी पक्षाला साेडचिठ्ठी दिली. या कालावधीत पक्षांतर करून पुन्हा निवडणूक लढविणाऱ्या १६ पैकी १० राज्यसभा सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर १२ पैकी ५ लाेकसभा सदस्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक लढविली.
पक्षांतरामुळे पडले सरकार
मध्य प्रदेश, कर्नाटक, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर या राज्यांमध्ये आमदारांनी राजीनामे दिल्याने सरकार पडले हाेते. या आमदारांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश करून पुन्हा निवडणूक लढविली हाेती.
n४३३ आमदार आणि
खासदारांचे पक्षांतर
n४०५ आमदारांनी पक्षाला केला रामराम
n१७० आमदार काँग्रेसचे
n१८२ आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश
n१८ आमदारांचा भाजपला रामराम