आसाममध्ये १.९ कोटी लोक ‘भारतीय’, एनसीआरची पहिली यादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 01:27 AM2018-01-02T01:27:49+5:302018-01-02T01:29:00+5:30
बहुप्रतीक्षित राष्ट्रीय नागरिक नोंदणीची (एनआरसी) पहिली यादी प्रकाशित करण्यात आली असून,आसाममधील ३ कोटी २९ लाख अर्जदारांपैकी १.९ कोटी लोकांना भारताचे कायदेशीर नागरिक म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
गुवाहाटी: बहुप्रतीक्षित राष्ट्रीय नागरिक नोंदणीची (एनआरसी) पहिली यादी प्रकाशित करण्यात आली असून,आसाममधील ३ कोटी २९ लाख अर्जदारांपैकी १.९ कोटी लोकांना भारताचे कायदेशीर नागरिक म्हणून मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित लोकांची नावे शहानिशा प्रक्रियेच्या विविध टप्प्यांत आहेत, भारताचे महानिबंधक शैलेश यांनी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री हा मसुदा प्रकाशित करताना स्पष्ट केले.
हा मसुद्याचा एक भाग आहे. यात १.९ कोटी लोकांच्या नावांचा समावेश आहे. उर्वरित लोकांबाबत विविध पातळीवर शहानिशा केली जात
आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर
दुसरा मसुदा प्रकाशित केला
जाईल, अशी माहिती शैलेश यांनी रविवारी मध्यरात्री घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
राष्टÑीय नागरिक नोंदणी विभागाचे राज्याचे समन्वयक प्रतीक हजेला यांनी सांगितले की, पहिल्या यादीत ज्यांची नावे नाहीत, अशांनी काळजी करण्याचे कारण नाही. शहानिशा करण्याची प्रक्रिया लांबलचक असल्याने पहिल्या यादीतून अनेकांची नावे समाविष्ट होऊ शकणार नाहीत. तथापि, त्यांनी काळजी करू नये. त्याच्यांशी संबंधित दस्तावेजांची शहानिशा केली जात आहे. दुसरी यादी कधी जारी करणार? असे विचारले असता हजेल यांनी
सांगितले की, याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात एप्रिलमध्ये होणाºया पुढल्या सुनावणीच्यावेळी केला जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखालीच या दस्तावेजांची शहानिशा केली जात आहे.
ही संपूर्ण प्रक्रिया २०१८ मध्येच पूर्ण केली जाईल, असे महानिबंधक शैलेश यांनी यावेळी स्पष्ट केले. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया मे २०१५ मध्ये सुरु करण्यात आली होती. यातहत आसाममधील ६८.२७ लाख कुटुंबियांकडून ६.५ कोटी दस्तावेज प्राप्त झाली होते.
बांगलादेशींवर उपाय
एनआरसी असलेले आसाम हे एकमेव राज्य आहे. १९५१ मध्ये एनआरसी तयार करण्यात आली होती. विसाव्या शतकापासून आसाममध्ये बांगलादेशातून लोकांचे लोंढे येत आहेत, त्यावर हा उपाय मानला जात आहे.