हृदयद्रावक! भावाला शाळेत सोडण्यासाठी वडिलांसोबत आलेल्या चिमुकलीचा बसखाली चिरडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 12:44 PM2024-01-05T12:44:54+5:302024-01-05T12:50:04+5:30
19 महिन्यांची मुलगी तिच्या वडिलांसोबत तिच्या भावाला स्कूल बसपर्यंत सोडण्यासाठी आली होती. तेवढ्यात ती मुलगी चालत रस्त्याजवळ आली.
तेलंगणातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तेलंगणातील हब्सीगुडा परिसरात एका 19 महिन्यांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. न्यूज एजन्सी एएनआयच्या रिपोर्टनुसार, 19 महिन्यांची मुलगी तिच्या वडिलांसोबत तिच्या भावाला स्कूल बसपर्यंत सोडण्यासाठी आली होती. तेवढ्यात ती मुलगी चालत रस्त्याजवळ आली.
चालकाने लक्ष न देता बस चालवली, त्यामुळे त्या निष्पाप मुलीच्या डोक्याला मार लागला आणि तिथेच तिचा मृत्यू झाला. माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, बस चालकावर निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बसचे हेल्पर एम. राणी यांच्यावरही या चिमुकलीबाबत चालकाला सावध न केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार सकाळी 8.10 वाजता घडला. चालकाने न पाहता बस चालवली, त्यामुळे मुलीला बसची धडक बसली आणि तिचा मृत्यू झाला. मुलगी तिचे वडील आणि आजीसह तिच्या मोठ्या भावाला शाळेत सोडण्यासाठी हब्सीगुडा येथील बसस्थानकावर आली होती. ज्वालान्ना मिधुन असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे.
पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली आहे. मुलीचं कुटुंब हब्सीगुडा येथील गल्ली क्रमांक 8 मध्ये राहतं. वडिलांनी चालकावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या चालक ताब्यात आहे असं पोलिसांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलं आहे.