खुशखबर! मुलांसाठीही आली Covid 19 लस; Zydus Cadila च्या लसीच्या आपात्कालिन वापरास मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 08:56 PM2021-08-20T20:56:04+5:302021-08-20T20:57:40+5:30
Coronavirus Vaccine for Children in India : १२ वर्षांपेक्षा अधिक वयोगटाच्या मुलांना देता येणार झायडस कॅडिलाची लस. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ़ इंडियाने आपात्कालिन वापरासाठी दिली मंजुरी.
सध्या देशात कोरोना संसर्ग कमी होताना दिसत असला तरी धोका मात्र पूर्णपणे टळलेला नाही. परंतु यादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. देशात आता १२ वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील मुलांचंही कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केलं जाणार आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ़ इंडियानं झायडस कॅडिलाच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या आपात्कालिन वापरास मंजुरी दिली आहे. ही जगातील पहिली भारतात तयार झालेली लस आहे जी डीएनए वर आधारित आहे. ही लस वयस्क लोकांसह १२ वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील लोकांनाही देण्यात येणार आहे.
ZyCoV-D कोरोनाच्या विरोधातील पहिली अशी लस असेल जी डीएनए लस असेल आणि कोणत्याही भारतीय कंपनीद्वारे विकसित करण्यात आली आहे. ही देशातील सहावी कोरोना प्रतिबंधात्मक लस ठरली आहे. यापूर्वी देशात सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन आणि रशियाच्या स्पुतनिक व्ही, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसींना मंजुरी देण्यात आली होती. समोर आलेल्या माहितीनुसार जेनेरिक औषध उत्पादक कंपनी कॅडिला हेल्थकेअल लिमिटेडनं ZyCoV-D लसीच्या आपात्कालिन वापरास मंजुरी दिली आहे. कंपनीनं यासाठी १ जुलै रोजी अर्ज केला होता.
Zydus Cadila receives approval for Emergency Use Authorization from DCGI for ZyCoV-D today. World’s first & India’s indigenously developed DNA based vaccine for #COVID-19 to be administered in humans including children & adults 12 yrs and above: Ministry of Science & Technology pic.twitter.com/VfL39B8xTJ
— ANI (@ANI) August 20, 2021
यापूर्वी या लसीची जवळपास २८ हजार स्वयंसेवकांवर चाचणी घेण्यात आली. या चाचणीत ही लस ६६.६ टक्के प्रभावशाली असल्याचं सांगण्यातआलं. समोर आलेल्या माहितीनुसार कोरोना विषाणूच्या विरोधात लढणारी पहिली प्लाझ्मा डीएनए लस आहे. यामध्ये विषाणूच्या काही घटकांचा वापर केला जातो. याद्वारे डीएनए अथवा आरएनएला सूचना दिली जाते जेणेकरून प्रोटिन तयार होईल आणि इम्युन सिस्टम वाढेल.