नवीन मोटर वाहन कायद्याद्वारे केली ५७७ कोटींची दंडवसुली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 06:52 AM2019-11-26T06:52:57+5:302019-11-26T06:53:18+5:30
नवीन मोटर वाहन कायदा लागू झाल्यानंतर देशातील १८ राज्यांत नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांकडून वाहतूक पोलिसांनी ५७७.५ कोटींचा दंड वसूल केला.
नवी दिल्ली : नवीन मोटर वाहन कायदा लागू झाल्यानंतर देशातील १८ राज्यांत नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांकडून वाहतूक पोलिसांनी ५७७.५ कोटींचा दंड वसूल केला. त्यातील २०१.९ कोटी रुपयांचा सर्वात मोठा वाटा उत्तर प्रदेशचा असून त्यानंतर गुजरात, बिहारचा क्रमांक लागतो. देशात सर्वात कमी दंडवसुली गोव्यामध्ये झाली असून ती ७८०० रुपये इतकी आहे.
महाराष्ट्रामध्ये वाहतूकीचे नियम मोडणाºया ६४१६ जणांना ४.१६ लाख रुपये दंड आकारण्यात आला. नवा मोटर वाहन कायदा लागू न केलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. नव्या कायद्यानुसार दंडाची रक्कम वाढविण्यात आलेली असली तरी महाराष्ट्रात अजून तो बदल झालेला नाही.
लोकसभेमध्ये यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, न्यायालयाला सादर केलेल्या चलानांमधील रकमेची बेरीज करून दंड आकारणीचा आकडा देण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांनी प्रत्यक्षात किती दंडवसुली केली याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
नवीन मोटर वाहन कायदा लागू झाल्यानंतर त्यातील तरतुदीनुसार प्रत्येक गुन्ह्याकरिता जो सर्वोच्च दंड आहे त्यानुसार वाहतूक पोलिसांनी चलान जारी केली. दंडाच्या मोठ्या रकमेमुळे त्याला देशभरात जोरदार विरोधही सुरू झाला. परिणामी गुजरात, उत्तराखंड, तामिळनाडू या राज्यांनी दंडाची रक्कम कमी केली.
एखादे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश नवीन मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी करत नसल्याचा एकही अहवाल आमच्या खात्याकडे आलेला नाही असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सांगत असले तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुधारित दंडाच्या रकमेबाबत अनेक राज्यांनी अद्याप अधिसूचना जारी केलेली नाही.
अपघात झाले कमी
भूपृष्ठ वाहतूक खात्याने म्हटले आहे की, नव्या मोटर वाहन कायद्याच्या अंमलबजावणीनंतर यंदा सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत रस्त्यांवरील अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे. या कालावधीत यंदा उत्तर प्रदेशमध्ये रस्ते अपघातात आतापर्यंत १,३५५ माणसे मरण पावल्याचे दिसून आले. हेच प्रमाण तिथे गेल्या वर्षी १५०३ इतके होते.