आयकरच्या कारवाईत १०० कोटी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 06:08 AM2020-03-03T06:08:18+5:302020-03-03T06:08:22+5:30
राज्यातील कर चुकवणारे राजकीय नेते, चार्टर्ड अकाऊंटंटस्, व्यावसायिक लोक आणि प्रशासकीय सेवांतील अधिकाऱ्यांवर ही कारवाई झाली असून सात लोक आणि ४७ ठिकाणांवर छापे घालण्यात आले.
रायपूर (छत्तीसगड) : आयकर विभागाने यावर्षीची बहुधा सगळ्यात मोठी छाप्यांची कारवाई संपूर्ण राज्यात २७ फेब्रुवारीपासून सुरू केली असून ती सोमवारीही सुरू होती. राज्यातील कर चुकवणारे राजकीय नेते, चार्टर्ड अकाऊंटंटस्, व्यावसायिक लोक आणि प्रशासकीय सेवांतील अधिकाऱ्यांवर ही कारवाई झाली असून सात लोक आणि ४७ ठिकाणांवर छापे घालण्यात आले.
आयकर विभागाची शाखा चार्टर्ड फ्लाईटस्ने येथे येऊन तिने एका हॉटेलमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन केला. सोमवारी सकाळी १०० कोटी रुपयांची रोख रक्कम छाप्यात हाती लागली. याशिवाय या शाखेने काही कोटी रुपये मूल्यांचे विदेशी चलनही ताब्यात घेतले. मुंबई, दिल्ली, हरयाणा आणि गुजरातेतून आयकर विभागाचे १०५ अधिकारी या कारवाईसाठीआलेले होते. केंद्रीय अन्वेषण विभागानेही (सीबीआय) या कारवाईत भाग घेतला. त्यांना ११ सायबर तज्ज्ञांचे साह्य होते. आणखी ३२ जणांचा या पैशांशी संबंध असल्याचे उघडकीस आले आहे. यानंतर छत्तीसगडमध्ये बिल्डर्स, सरकारी अधिकारी आणि काही मोठ्या व्यावसायिकांवर कारवाई होईल.