पश्चिम बंगालमध्ये बोट उलटल्यानं दोघांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 07:55 AM2019-10-04T07:55:36+5:302019-10-04T07:56:52+5:30
बोटीतून जवळपास ५० जण प्रवास करत असल्यानं मृतांची संख्या वाढण्याची भीती
मालदा: पश्चिम बंगालमधल्या मालदात बोट उलटल्यानं दोघांचा मृत्यू झाला आहे. या बोटीतून जवळपास ५० जण प्रवास करत होते. यापैकी २० जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर बाकीचे प्रवासी बेपत्ता आहेत. सध्या घटनास्थळी एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू आहे. अपघातग्रस्त झालेली बोट बिहारच्या कटिहारमधून पश्चिम बंगालमधल्या मालदाला जात होती.
महानंदा नदीमध्ये बोट उलटल्यानं दोघांचा मृत्यू झाला. मालदा जिल्ह्यातल्या चंचल पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. मुकूंदपूर घाट परिसरात पोहोचण्यापूर्वीच प्रवासी बोट उलटली. आतापर्यंत दोन जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. बोटीतून ५० जण प्रवास करत असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या घटनास्थळी वेगानं बचावकार्य सुरू आहे. बोटीतून प्रवास करणारे सर्वजण दिनाजपूरमध्ये बैच उत्सव पाहण्यासाठी चालले होते.
Malda District Magistrate,Kaushik Bhattacharya: Two people have died and 28 have been rescued after a boat carrying them capsized in Mahananda river, today. NDRF personnel are at the spot. The boat was carrying people to Katihar in Bihar from Malda in West Bengal. https://t.co/3rD9DtLSvM
— ANI (@ANI) October 3, 2019
आतापर्यंत दोन प्रवाशांचे मृतदेह हाती लागले असून एकूण प्रवासी संख्या पाहता मृतांची संख्या वाढू शकते, अशी माहिती मालदाचे पोलीस अधीक्षक आलोक रजारिया यांनी दिली. गुरुवारी संध्याकाळी उशिरा ही घटना घडली. या बोटीत प्रवाशांसह सायकल आणि मोटारसायकलदेखील होत्या. याशिवाय बोटीतील प्रवाशांची संख्यादेखील जास्त होती. सध्या घटनास्थळी पूर्ण क्षमतेनं बचावकार्य सुरू असल्याचं रजारिया यांनी सांगितलं.