पावणे २ लाख फी, अनेक शहरात शाखा..; IAS Rau कोचिंग सेंटरचा इतिहास, जिथं ३ जीव गेले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 01:17 PM2024-07-29T13:17:22+5:302024-07-29T13:17:46+5:30
दिल्लीत बेसमेंटमध्ये पाणी भरल्याने ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर सर्वच स्तरावरून संबंधित कोचिंग सेंटरवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
नवी दिल्ली - शहरातील ओल्ड राजेंद्र नगर इथली आयएएस स्टडी सेंटर सध्या खूप चर्चेत आहे. या कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी घुसल्याने ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर कोचिंग सेंटरवर अनेक आरोप होत आहेत. सेंटरविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. संस्थेवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. नेमकी ही संस्था कधीपासून कोचिंग सेंटर चालवते, त्याबाबत जाणून घेऊया.
कोण आहे कोचिंग सेंटरचा मालक?
कोचिंग सेंटरच्या अधिकृत वेबसाईटनुसार, गेल्या ७० वर्षापासून ही संस्था सुरू आहे. १९५३ साली सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांपैकी एक तृतीयांश अधिकारी याच संस्थेतून शिकल्याचा दावा या संस्थेने केला आहे. या संस्थेची सुरुवात डॉक्टर एस राव यांनी केली होती. तिथे आता स्पर्धा परीक्षेच्या तयारीचा अभ्यास केला जातो. १९५३ साली निर्माण झालेल्या या संस्थेच्या ब्रँच दिल्ली, जयपूर, बंगळुरु इथे आहेत. सध्या कंपनीचे सीईओ अभिषेक गुप्ता हे आहेत त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. अभिषेक गुप्ता हे २००९ पासून आयएएस स्टडी सेंटरचे सीईओ आहेत.
#WATCH | Delhi BJP workers and leaders protest against the AAP government in Delhi, near AAP Office, over the Old Rajinder Nagar incident where 3 students died after the basement of a coaching institute was filled with water on July 27. pic.twitter.com/LgMBPBKqta
— ANI (@ANI) July 29, 2024
किती आहे फी?
या कोचिंग सेंटरच्या फीबाबत सांगायचं झालं तर वेबसाईटनुसार, जनरल स्टडीच ऑफलाइन फाऊंडेशन कोर्सची फी १ लाख ७५ हजार आहे. त्यात लाईव्ह ऑनलाइन कॉर्सची फी ९५ हजार ५०० रुपये आहे. ऑप्शनल मेस फाऊंडेशन कोर्सची फी ५५ हजार ५०० रुपये आहे. सीसॅट फाऊंडेशन कोर्स फी १८५०० इतकी आहे. त्यात ऑनलाईन कोर्सची फी १२५०० रुपये आहे.
राजेंद्र नगरमध्ये झालेल्या ३ मृतकांमध्ये २५ वर्षीय तानिया सोनी, २५ वर्षीय श्रेया यादव आणि २८ वर्षीय नेवीन डाल्विन यांचा समावेश आहे. तानिया आणि श्रेया यूपीत राहणाऱ्या होत्या तर नवीन मूळचा केरळचा होता. कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये लायब्रेरी बनवण्यात आली होती. त्यात मुले अभ्यास करायची. शनिवारी मुलं अभ्यास करताना अचानक बेसमेंटमध्ये पाणी भरले त्यावेळी हे तिघे तिथे अडकले. या घटनेमुळे दिल्लीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी संबंधित कोचिंग सेंटर प्रशासनावर कारवाई सुरू केली आहे.