रिटेल क्षेत्रातील २ लाख कामगार बेकार होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 05:50 AM2020-04-11T05:50:46+5:302020-04-11T05:50:56+5:30
लॉकडाऊनमुळे किरकोळ विक्री क्षेत्रातील दोन लाख कामगारांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता असल्याने हे टाळण्यासाठी केंद्र सरकारने त्वरित हस्तक्षेप करून परिस्थितीत सुधारणा केली पाहिजे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोरोना साथीच्या निर्मूलनासाठी लागू करण्यात आलेला २१ दिवसांचा लॉकडाऊन सर्वांच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक असल्याने देशभरात त्याचे पालन होत आहे. असे असले, तरी त्याची दुसरी बाजूही विचार करायला लावणारी आहे. लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रांना फटका बसला असून, देशातल्या किरकोळ विक्री क्षेत्रातील ४० टक्के म्हणजे, दोन लाख कामगार बेकार होण्याची शक्यता रिटेलर्स असोसिएशन आॅफ इंडियाने (आरएआय) व्यक्त केली आहे.
आरएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार राजगोपालन यांनी सांगितले की, देशातील किरकोळ विक्री क्षेत्रामध्ये ६० लाख कामगार आहेत. कोरोनाच्या साथीमुळे किरकोळ क्षेत्रातील वस्तूंची विक्री कमी झाली असून, त्यामुळे कामगारांच्या रोजगारावरही परिणाम झाला आहे. देशातील ७५ जिल्ह्यांमध्ये येत्या काही दिवसांत परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. किरकोळ विक्री क्षेत्रातील अनेक व्यापारी कपडे, ज्वेलरी आदींची विक्री करतात. त्यांच्या उत्पन्नात टाळेबंदीमुळे ७५ टक्के घट झाल्याचा दावा राजगोपालन यांनी केला.
ते म्हणाले की, लॉकडाऊनमुळे किरकोळ विक्री क्षेत्रातील दोन लाख कामगारांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता असल्याने हे टाळण्यासाठी केंद्र सरकारने त्वरित हस्तक्षेप करून परिस्थितीत सुधारणा केली पाहिजे.
सरकारकडे सवलतींची मागणी
किरकोळ व्यापाऱ्यांना कर्जाचे हप्ते, तसेच जीएसटीचा भरणा करण्यात केंद्र सरकारने काही काळ सवलत द्यावी. तसे न झाल्यास या व्यापाºयांच्या उत्पन्नात आगामी सहा महिन्यांत ९० टक्के घट होईल, अशी भीती आरएआयने व्यक्त केली आहे. आरएआय या संस्थेमध्ये किरकोळ विक्री करणारे पाच लाख दुकानदार सदस्य आहेत. त्यामध्ये व्ही. मार्ट, शॉपर स्टॉप, फ्युचर ग्रुप, अॅव्हेन्यू सुपरमार्ट्स आदींचा समावेश आहे. किरकोळ विक्री क्षेत्रातील महत्त्वाच्या अन्य कंपन्यांनी कोरोना साथीमुळे आपले उत्पन्न घटल्याचे याआधीच जाहीर केले आहे.