बिहार विधानसभेत एकाच चेहऱ्याचे २ आमदार?; अधिवेशनात अध्यक्षही क्षणभर गोंधळले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 03:36 PM2022-03-28T15:36:09+5:302022-03-28T15:36:46+5:30
रोहतास येथील यूवकाच्या बेपत्ता प्रकरणाचा मुद्दा आरजेडी आमदार फतेह बहादूर यांनी विधानसभेत मांडला.
पटना – सोशल मीडियावर अशा अनेक घटना आणि किस्से व्हायरल झाल्याचं तुम्ही नेहमी पाहिलं असेल. भारतात एक गाव असे आहे ज्या गावात बहुतांश मुलं जुळी जन्माला येतात. या गावची किर्ती जगभरात पसरली आहे. जुळी व्यक्ती तुमच्यासमोर आली तर तुम्हीही गोंधळून जाल. बिहारच्या विधानसभेत असाच काहीसा प्रकार चक्क विधानसभा अध्यक्षांसोबत घडला आहे. या अजब प्रकाराची चर्चा दिवसभर राजकीय वर्तुळात रंगली होती.
विधानसभेत चक्क एकाच चेहऱ्याचे २ आमदार पाहून विधानसभा अध्यक्षही चक्रावले. आरजेडी आमदार रितलाल यादव आणि आमदार फतेह बहादूर यांचा चेहरा खूप मिळताजुळता आहे. विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू होता. त्यावेळी आरजेडी आमदार फतेह बहादूर प्रश्न विचारण्यासाठी सभागृहात उभे राहिले तेव्हा विधानसभा अध्यक्ष विजय कुमार गोंधळले. काही मिनिटं विधानसभा अध्यक्षांना आमदार रितलाल यादव उभे राहिल्याचा भास झाला. तेव्हा अध्यक्षांनी तुम्ही फतेह बहादूरच आहात ना? असा प्रश्न केला. अध्यक्षांनी विचारलेल्या प्रश्नावर सभागृहात उपस्थित आमदारांमध्ये कुजबूज सुरू झाली.
रोहतास येथील यूवकाच्या बेपत्ता प्रकरणाचा मुद्दा आरजेडी आमदार फतेह बहादूर यांनी विधानसभेत मांडला. जेव्हा अध्यक्षांनी नाव पुकारलं तेव्हा फतेह बहादूर त्यांच्या जागेवर उभे राहिले. परंतु विधानसभा अध्यक्ष फतेह बहादूर आणि रितलाल यादव यांच्यात गोंधळले. सुरुवातीला अध्यक्षांनी तुम्ही नाही असं म्हटलं. त्यानंतर काही मिनिटांनी बरं तुम्हीच प्रश्न विचारा असं सांगितले. आमदार रितलाल यादव आणि आमदार फतेह बहादूर यांची उंची, चेहरा खूप मिळताजुळता आहे. इतकेच नाही तर दोन्ही नेत्यांची हेअरस्टाइलही सेम आहे. त्यामुळेच विधानसभा अध्यक्षांचा या दोन्ही आमदारांना ओळखताना गोंधळ झाला.