पंधरा दिवस लोटले, अरुणाचल प्रदेशातील दोन बेपत्ता जवानांचा थांगपत्ता लागेना; धाकधुक वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 12:21 PM2022-06-13T12:21:57+5:302022-06-13T12:22:33+5:30
या भागात जोरदार पाऊस सुरु आहे यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अशा परिस्थितीत देखील आपल्या सैनिकांना शोधण्यासाठी जवान दिवसरात्र एक करत आहेत.
अरुणाचल प्रदेशमध्ये गेल्या महिन्याच्या २८ तारखेला लष्कराचे दोन जवान बेपत्ता झाले होते. भारतीय सैन्यदलाने दिवसरात्र एक करून त्यांचा गेल्या १५ दिवसांपासून शोध सुरु ठेवला आहे. परंतू, अद्याप ते सापडले नसल्याने धाकधुक वाढली आहे. सैन्य दलाने रविवारी याबाबत माहिती दिली आहे. शोधमोहिमेला अद्याप यश आलेले नाही, आपले सैनिक सापडलेले नाहीत, असे यामध्ये म्हटले आहे.
पीआरओ तेजपुर कर्नल अमरिंदर वालिया यांनी ही माहिती दिली आहे. अरुणाचल प्रदेशच्या अंजॉ जिल्ह्यात देशाच्या सुरक्षेसाठी अतिमहत्वाच्या असलेल्या भागातील चौकीवर हे दोन जवान तैनात होते. वालिया यांनी सांगितले की, नायक प्रकाश सिंह आणि लांस नायक हरेंद्र सिंह हे दोघे बेपत्ता झाले आहेत. ते चुकून नदीत पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यांच्या शोधासाठी गस्ती विमाने आणि डॉग स्क्वॉडसह भारतीय जवान तेनात करण्यात आले आहेत. अद्याप या दोघांचा शोध लागलेला नाही.
गेल्या दोन आठवड्यांपासून दिवस रात्र शोध मोहिम सुरु आहे. सैन्य दलाने या घटनेवर 'कोर्ट ऑफ इंक्वायरी' बसविली आहे. हे दोन्ही सैनिक उत्तराखंडचे राहणारे आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना दररोज इथल्या परिस्थितीची माहिती दिली जात आहे. चीनच्या सीमेवरील हा भाग गढ़वाल रेजिमेंटच्या ताब्यात आहे. हा भाग अत्यंत महत्वाचा आहे. एलएसीजवळ असल्याने कोलकाताहून या रेजिमेंटच्या ईस्टर्न कमांडकडून येथील देखरेख केली जाते. या भागात जोरदार पाऊस सुरु आहे यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अशा परिस्थितीत देखील आपल्या सैनिकांना शोधण्यासाठी जवान दिवसरात्र एक करत आहेत.
या भागात अशी अनेक पोस्ट आहेत जिथे चीनचे सैन्य अत्यंत जवळ आहे. चीन नेहमी अरुणाचल प्रदेशवरून हा भाग आपला असल्याचा दावा ठोकत असतो. हा भाग डोंगराळ आणि तीव्र उताराचा व जंगलांचा आहे.